जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाखांवर

World Coronaबाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात चोवीस तासात तीन हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ६४ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिका, ब्राझीलबरोबर इराणमध्ये ही साथ भयंकर वेगाने फैलावत असल्याची नोंद जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने केली आहे. दरम्यान, आफ्रिकेतील ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ हा देश एकाचवेळी कोरोनाव्हायरस, गोवर आणि इबोला या साथींच्या विळख्यात सापडल्याची माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) दिली.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दगावलेल्यांची संख्या ३,७८,११३ वर पोहोचली असून गेल्या चोवीस तासातील ३,११२ रुग्णांचा यात समावेश आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने अमेरिकेत ७४३ तर ब्राझीलमध्ये ६२३ आणि युरोपात ५०९ जणांचा बळी घेतला आहे. तर या चोवीस तासात इराणमध्ये ३२४ जण दगावल्याचा दावा फ्रान्सस्थित ‘नॅशनल कौन्सिल ऑफ रेझिस्टन्स ऑफ इराण’ (एनसीआरआय) या इराणी बंडखोर गटाने केला आहे. या साथीने आत्तापर्यंत इराणमध्ये ४८,५०० जणांचा बळी घेतल्याचा आरोप या संघटनेने केला. पण आपल्या देशातील कोरोनाच्या बळींची संख्या आठ हजाराच्या जवळ असल्याचा दावा इराणचे सरकार करीत आहे.

Corona Worldwideगेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाचे १,०३,००० नवे रुग्ण सापडल्याची माहिती, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली. एकट्या अमेरिकेतच एका दिवसात या साथीचे २२ हजाराहून अधिक रुग्ण सापडले असून अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या अठरा लाख साठ हजारांच्या पुढे गेली आहे. युरोपमध्ये या साथीचे जवळपास बावीस लाख रुग्ण असून गेल्या चोवीस तासात युरोपिय देशांमध्ये १७,३२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये १२,९४७ आणि रशियामध्ये ८,८६३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे इराणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराहून अधिक रुग्ण सापडले असून अस्वच्छता आणि बेफिकिरीमुळे इराणमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संघटना करीत आहेत.

आफ्रिकेतील ५७ देशांमध्ये या साथीने आतापर्यंत ४,३०० जणांचा बळी घेतला असून आफ्रिका खंडातील या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या दीड लाखांच्यावर गेली आहे. इजिप्तमध्ये या साथीने १,००५ रुग्ण दगावले असून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक ३५ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. आफ्रिकेतील ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ (डीआरसी) या देशाला सध्या तीन साथींचा एकत्र सामना करावा लागत आहे. ‘डीआरसी’मध्ये कोरोनाने आतापर्यंत ७२ जणांचा बळी घेतला असून ३,३२६ जणांना या साथीची लागण झाली आहे. तर गोवरमुळे ह्या देशात ६,७७९ जणांचा मृत्यू झाला असून या साथीचे साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण ‘डीआरसी’ असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून ‘डीआरसी’मध्ये इबोला या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सहा रुग्णांपैकी चार जणांचा बळी गेला आहे.

coronaदरम्यान, वुहानमधील कोरोनाव्हायरसची माहिती पहिल्यांदा जगासमोर मांडणारे आणि नंतर या साथीचे बळी ठरलेले डॉक्टर ली व्हेनलियांग यांचे सहाय्यक डॉक्टर हू वेनपियांग व डॉक्टर फॅन हे देखील मंगळवारी या साथीने दगावले आहेत. डॉक्टर वेनपियांग आणि डॉक्टर फॅन यांचे शरीर उपचारादरम्यान काळे पडल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे चीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीची खरी माहिती उघड करणाऱ्यांचा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून काटा काढला जातो किंवा त्यांच्यावर दडपण टाकून त्यांना आपली विधाने बदलण्यास भाग पाडले जाते, याकडे जगभरातील नेटकर लक्ष्य वेधत आहेत.

leave a reply