कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना चाचण्या वाढविण्याच्या सूचना

नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने चिंतादायक व्हेरिअंट असा उल्लेख केलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन हा नवा स्ट्रेन अद्याप भारतात सापडला नाही. मात्र या व्हेरिअंटची लागण झालेले रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या वेगाने वाढत आहेत. ब्रिटन, जर्मनी, नेदरलॅण्ड, इटली, ऑस्ट्रेलिया, झेक रिपब्लिक अशी ओमिक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतातही खबरदारीचे उपाय सुरू करण्यात आले आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. तर रविवारी केंद्रिय आरोग्य सचिवांनी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये चाचण्या वाढविण्यावर भर द्या, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना चाचण्या वाढविण्याच्या सूचनाकोरोनाच्या नव्या व्हेरिअंटपासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधकात्मक पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिअंट आढळलेल्या देशांमध्ये जोखीम असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. तसेच परदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांची तपासणीकडे लक्ष पुरवा. तसेच कोरोना संसर्ग झालेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन करा, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना दिलेल्या सूचनांच्या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य विभागाने काही राज्यांनी चाचण्या कमी केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कोरोना संसर्ग किती प्रमाणात पसरत आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कायम राखणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले होते. तसेच कोणत्या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत, याची ओळख पटविण्यासाठी चाचण्या व्हायला हव्यात. मात्र काही राज्यांनी रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे चाचण्याही कमी केल्या आहेत. यावर केंद्र सरकारने पत्र लिहून राज्यांना चाचण्याचे महत्त्व सांगितले होते. युरोपातील काही देशांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर चाचण्या वाढविण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या होत्या.

त्यानंतर ओमिक्रॉन या दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिअंटची माहिती उघड झाली. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य सचिवांनी जारी सूचनांमध्ये राज्यांना चाचण्या वाढविण्यास सांगण्यात आले आहे. राज्यांनी जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात आणि संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा खाली राखण्याचा प्रयत्न करावा, असे केंद्राने म्हटले आहे. तसेच हॉटस्पॉट अर्थात संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या भागातील नमूने जिनोम तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवा. तसेच विमानतळांवर परदेशातून आलेला प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचे नमूनेही जिनोम सिक्वेन्स तपासणीसाठी पाठवा, असे केंद्राने म्हटले आहे.

दरम्यान, केंद्राकडून विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर (एसओपी) सुद्धा जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षेतखाली एक बैठक पार पडली. त्यानंतर या सूचना जारी करण्यात आल्या. या बैठकीला नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही.के.पॉल, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्यासह आरोग्य मंत्रालय, नागरी उड्डयन मंत्रालय व इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

leave a reply