जपानच्या मंत्रिमंडळाची अतिरिक्त संरक्षणखर्चाला मंजुरी

टोकिओ – ‘जपानचे संरक्षणसामर्थ्य वाढविण्यासाठी आपण सर्व पर्यायांचा विचार करु. त्यात शत्रूच्या तळावर हल्ला चढविण्यासाठी योग्य क्षमता मिळविण्याचाही समावेश असेल’, अशा शब्दात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी वाढत्या संरक्षणखर्चाचे समर्थन केले. जपानच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी ६.८ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणखर्चाला मंजुरी दिली. हा निधी प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स व इतर शस्त्रास्त्रांसाठी वापरण्यात येईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

जपानच्या मंत्रिमंडळाची अतिरिक्त संरक्षणखर्चाला मंजुरीगेल्या काही वर्षात चीन तसेच उत्तर कोरियाकडून आक्रमक हालचाली सुरू आहेत. चीन जपाननजिकच्या सागरी हद्दीत सातत्याने युद्धनौका तसेच गस्तीनौका धाडत असून काही महिन्यांपूर्वी एका पाणबुडीचाही वावर आढळला होता. चीनने रशियन युद्धनौकांच्या सहाय्याने जपानच्या सागरी हद्दीजवळ गस्ती मोहिमही राबविली होती. दुसर्‍या बाजूला उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रक्षमता वाढविण्याच्या हालचाली सुरू असून गेल्या काही महिन्यात नव्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत.

या घटनांमुळे जपानच्या सुरक्षेला असणारा धोका वाढला आहे. चीन व उत्तर कोरियाच्या धोक्यापासून मुकाबला करण्यासाठी जपानकडून सातत्याने संरक्षणसामर्थ्यात भर टाकण्यात येत आहे. त्यासाठी दरवर्षी संरक्षणखर्चही वाढविण्यात येत असून यावर्षी त्यात अतिरिक्त भर टाकण्यात आली आहे. जपानच्या मंत्रिमंडळाची अतिरिक्त संरक्षणखर्चाला मंजुरीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जाहीर झालेल्या विशेष पॅकेजमध्ये संरक्षणक्षेत्राचाही समावेश करण्यात आला होता. या पॅकेजनुसार, ६.८ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

अतिरिक्त तरतुदीच्या माध्यमातून नव्या संरक्षण यंत्रणा खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचा समावेश आहे. शनिवारी जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी संरक्षणतळाला दिलेल्या भेटीत वाढीव संरक्षणखर्चाचे समर्थन केले. यावेळी त्यांनी जपानभोवतालची सुरक्षाविषयक स्थिती चिंताजनक असल्याचे सांगून संरक्षणखर्चात दुपटीने वाढ करण्याचीही तयारी दर्शविली आहे.

leave a reply