भारतीय माध्यमांनी तैवानला व्यासपीठ देऊ नये

- चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांची मागणी

नवी दिल्ली – ‘भारतीय माध्यमांनी तैवानमधील विघटनवाद्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ नये आणि सर्वमान्य असलेल्या ‘वन चायना’ धोरणाचा आदर राखावा’, अशी अपेक्षा चीनच्या भारतातील दूतावाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय माध्यमांमधील काहीजणांकडून तसे केले जात असल्यामुळे चुकीचे संदेश मिळत आहेत, असा दावा चिनी दूतावासाचे प्रवक्ते वँग शाऊजियांग यांनी केला. त्यांच्या या आक्षेपांमुळे चीनचे नवे दुखणे समोर आले आहे. भारत व तैवान विविध क्षेत्रात सहकार्य करू लागले असून सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात भारत व तैवानचे सहकार्य चीनच्या नजरेत खुपणारे ठरते. त्या पार्श्‍वभूमीवर, चीनने भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय माध्यमांनी तैवानला व्यासपीठ देऊ नये - चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांची मागणीचीनमध्ये माध्यमे स्वतंत्र नाहीत. चीनमधील माध्यमांची मालकी या देशाच्या कम्युनिस्ट राजवटीकडे आहे. यामुळे चीनच्या राजवटीविरोधात माध्यमांमध्ये चकार शब्द उच्चारला जात नाही. इतर देशांमधील माध्यमांनीही चिनी माध्यमांचे अनुकरण करावे, अशी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची अपेक्षा आहे. म्हणूनच चीन तैवानबाबत भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनी अस्वस्थ बनला असून हे ‘वन चायना’ धोरणाचे उल्लंघन असल्याचा आक्षेप चीनने नोंदविल्याचे दिसते. ‘वन चायना पॉलिसी’नुसार तैवान हा चीनचा भाग मानला जातो व याला भारतानेही मान्यता दिलेली आहे. भारताबरोबरील सीमा व्यवस्थापन तसेच अन्य करार पायदळी तुडवून चीनने चिथावणीखोर कारवाया केल्या होत्या. आपल्याला मात्र करार मोडण्याचा विशेषाधिकार असून भारताने मात्र करारांचे पालन करालायच हवे, अशी चीनची फाजिल अपेक्षा असल्याचे दिसते.

एलएसीवरील चीनच्या चिथावणीखोर कारवायांमध्ये वाढ झालेली असताना, भारतानेही तैवानबाबतचे आपले पारंपरिक धोरण बदण्याचे संकेत दिले आहेत. भारताच्या शेजारी देशांचा वापर करून चीन व्यूहरचना आखत असताना, भारताच्या धोरणात झालेल्या या आक्रमक बदलांचे सामरिक विश्‍लेषकांकडून स्वागत केले जाते. याचे स्वाभाविक पडसाद भारतीय माध्यमसृष्टीत उमटले आहेत. यामुळे तैवानबरोबरील भारताच्या सहकार्याबाबतच्या बातम्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी अत्यावश्यक असलेल्या सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीक्षेत्रात आघाडीवर असलेला तैवान यासंदर्भात भारताशी सहकार्य वाढवित आहे. याचा फार मोठ धक्का चीनला बसला आहे.

सेमीकंडक्टर क्षेत्रातील तैवानी कंपनी भारतीय कंपन्यांबरोबर यासंदर्भात चर्चा करीत आहे. ही बाब चीनला असुरक्षित करणारी ठरली असून यामुळे सदर क्षेत्रातील आपला प्रभाव मोडीत निघेल अशी चिंता चीनला वाटू लागली आहे. तसेच भारतासारख्या लोकशाहीवादी देशाकून तैवानला मिळालेला प्रतिसाद इतर देशांनाही तसे करण्यासाठी उत्तेजन देईल, याची धास्ती चीनला वाटत आहे. म्हणूनच भारताला यासंदर्भात इशारा देण्यासाठी चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी भारतीय माध्यमांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply