डेल्टा प्लस व्हेरियंट; केंद्र सरकारचा महाराष्ट्र, केरळ व मध्यप्रदेशला इशारा

नवी दिल्ली – कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढविल्या आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशात कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वेगाने पसरत असल्याचे लक्षात आले आहे. जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांच्या विश्‍लेषणातून ही बाब उघड झाल्यावर केंद्र सरकारने या तीनही राज्यांना तातडीने पावले उचलण्यास सांगितले आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट केंद्र सरकारचा महाराष्ट्र, केरळ व मध्यप्रदेशला इशाराकोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपासून तयार झालेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याने गेल्या आठवड्यात समोर आले होते. ज्या राज्यात हे रुग्ण आढळले, या राज्यांमधून जिनोम सिक्वेन्ससाठी पाठविण्यात येत असलेल्या नमून्यांची संख्या वाढविण्यात आली होती. याचे संपूर्ण अहवाल अजून यायचे असले, तरी डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आले आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात डेल्टा प्लसचे सहा रुग्ण आढळल्याचे म्हटले होते.

मात्र आता त्यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेन्स चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमून्यांपैकी २१ नमूने हे डेल्टा प्लसचे असल्याचे लक्षात आले. यामध्ये रत्नागिरीत सर्वाधित ९ रुग्ण आढळले आहेत. तर जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, ठाणे आणि सिंधुदूर्गात डेल्टा प्लसच्या एका एका रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची पुष्टी केली आहे. महाराष्ट्रातून एकूण ७५०० नमूने जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. केरळच्या पलक्कड आणि पथनथिट्टामधून गेलेल्या नमून्यातही डेल्टा प्लसचे काही नमूने होते. तसेच मध्ये प्रदेशच्या भोपाळ आणि शिवपूरीमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने या राज्यांना ऍलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट केंद्र सरकारचा महाराष्ट्र, केरळ व मध्यप्रदेशला इशारायंत्रणांना तयार ठेवा, कोरोनाच्या संक्रमणाकडे लक्ष द्या. डेल्टा व्हेरियंटबद्दल अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून ज्या भागात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले, तेथे त्वरेने कंटेन्मेंट झोन बनवा, गर्दी कमी करा. आधीपासून आरोग्य यंत्रणा सजग असल्या, तरी त्यांना अधिक सजग राहण्याची व पूर्ण कार्यक्षमतेने काम करण्यासाठी सज्ज ठेवण्याची आवश्यकता आहे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना दिल्या आहेत. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना दिला आहे.

दरम्यान आतापर्यंत भारतासह ९ देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्सर्झंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी होत होती. मात्र डेल्टा प्लस त्याहून घातक असून औषधांना दाद देत नसल्याचे तसेच रोगप्रतिकारक क्षमता या व्हेरियंटपुढे कमी पडत असल्याचे लक्षात आले आहेत. तसेच हा व्हेरियंट अजून कशाप्रकारे शरीरावर परिणाम करेल, हे अजून लक्षात आलेले नाही. त्यामुळे या व्हेरियंटबाबत सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.

leave a reply