उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी लस कंपन्यांना केंद्राचे साडे चार हजार कोटींचे सहाय्य

नवी दिल्ली – देशात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग देण्यासाठी पुढील टप्प्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला होता. तर बुधवारी देशातील लसींचे उत्पादन घेणार्‍या कंपन्यांसाठी साडे चार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची केंद्र सरकारने घोषणा केली. लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी या कंपन्यांना हे सहाय्य केले जाणार आहे. केंंद्रीय अर्थमंत्रालयाने यासंंबंधी घोषणा केली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस उत्पादक कंपन्यांबरोबर संवाद साधला.

भारतात ‘ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’चे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूटतर्फे घेतले जात आहे. तर भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन भारत बायोटेकडून घेतले जात आहे. देशात कोरोला लसीकरणाचा वेग वाढवायचा असल्यास या दोन्हुी कंपन्यांच्या क्षमता वाढविणे आवश्यक आहे. नुकतेच सरकारने ‘हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ आणि ‘भारत इम्युनोलॉजिकल्स व बायोलॉजिक्स लिमिटेड’ या तीन संस्थांना ‘कोव्हॅक्सिन’उत्पादन घेण्यास मंजुरी दिली होती. मात्र याबरोबर सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला आपली क्षमता वाढविण्यासाठी निधीची आवश्यकता पाहता केंद्रीय अर्थमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

सिरम इन्स्टिट्यूट जुलैपर्यंत २० कोटी कोरोना डोस पुरविणार आहे. तर भारत बयोटेक ९ कोटी डोसचा पुरवठा करणार आहे. सरकार दीडशे रुपये प्रती डोस या प्रमाणे ही लस या कंपन्यांकडून खरेदी करीत आहे. त्याचे आगऊ पैसे देऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने या दोन संस्थांनी आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील तीन हजार कोटी रुपये हे सिरम इन्स्टिट्यूटला मिळणार आहेत. तर दीड हजार कोटी रुपये हे भारत बायोटेकला देण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक अदार पुणावाला यांनी लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यानंतर भारत बायोटेकने हैदराबाद आणि बंगळरू येथील प्रकल्पातील आपली उत्पादन क्षमता वर्षाला ७० कोटी डोस इतकी विस्तारण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, मंगळवारी लस उत्पादक कंपन्यांच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. या बैठकीत आपल्या लस उत्पादकांच्या क्षमतेवर पंतप्रधान मोदी यांनी विश्‍वास व्यक्त केला. तसेच लसीकरणाचा वेग वाढवायचा असल्याने लस उत्पादकांनी कमीतकमी वेळेत लस उत्पादन क्षमता सातत्याने वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.

leave a reply