युक्रेनच्या सीमेजवळ रशियाची प्रचंड प्रमाणात सैन्यतैनाती

- पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय

वॉशिंग्टन/सेवास्तोपोल/किव्ह – ‘सात वर्षांपूर्वी, २०१४ साली रशियाने क्रिमिआवर हल्ले चढविण्याची युक्रेनच्या सीमेजवळ जी काही सैन्यतैनाती केली होती, त्याहून अधिक संख्येने आत्ता केली आहे. रशियाची ही तैनाती नक्कीच गंभीर चिंतेची बाब ठरते’, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केली. याशिवाय ब्लॅक सीच्या आखातात रशियाने २० विनाशिकांसह सुरू केलल्या युुद्धसरावावरही अमेरिकेने टीका केली. दरम्यान, रशियाने आपल्या सीमेजवळ एक लाख २० हजार सैन्य तैनात केल्याचा दावा युक्रेन करीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात तैनाती वाढविली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत डोन्बासच्या सीमेजवळ ८० हजार जवान व रणगाडे तैनात असल्याचा दावा युक्रेनने केला होता. पण युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी ही संख्या एक लाखापर्यंत असल्याचे म्हटले आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये रशियाने तैनाती वाढवून एक लाख २० हजारापर्यंत नेल्याचे युक्रेनने स्पष्ट केले.

युक्रेनच्या सीमेजवळील रशियाच्या या तैनातीवर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. ‘या लष्करी हालचालीद्वारे चिथावणी देणे रशियाने रोखावे व या क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरतेसाठी सहकार्य करावे. तसेच आपल्या या भल्यामोठ्या तैनातीमागील हेतूबाबत रशियाने पारदर्शकता ठेवावी’, असे आवाहन पेंटॅगॉनचे प्रवक्ते किरबाय यांनी केले. रशियाने आधीच आपल्या या सैन्यतैनातीचे समर्थन केले होते. सदर क्षेत्रात आयोजित केलेल्या युद्धसरावासाठी तसेच नाटोच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, ही तैनाती असल्याचे रशियाने म्हटले होते.

दरम्यान, सोमवारपासून ब्लॅक सीच्या क्षेत्रातील रशियाच्या विनाशिकांचा सराव सुरू झाला आहे. या सरावात रशियन नौदलाच्या २० विनाशिका त्यांच्याबरोबर ‘सुखोई-२५एसएम३’ ही लढाऊ विमाने देखील सहभागी झाली आहेत. ब्लॅक सीच्या क्षेत्रात हा सराव आयोजित करून रशियाने सदर सागरी तसेच हवाई क्षेत्राची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. तर रशियाने अमेरिकेचे हे आरोप फेटाळले आहेत.

युक्रेनच्या विरोधात रशियाने स्वीकारलेल्या या लष्करी आक्रमकतेच्या विरोधात नाटोने कठोर भूमिका घ्यावी आणि नाटोच्या सदस्य देशांनी रशियन राजदूतांची हकालपट्टी करावी, असे आवाहन युक्रेन व झेक प्रजासत्ताकने केले आहे.

leave a reply