नौदलात ‘एएलएच एमके ३’ हेलिकॉप्टर्सचे स्क्वाड्रन कार्यन्वित

नवी दिल्ली – भारतीय बनावटीचे ‘ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर’ ‘एमके ३’चे पहिले स्क्वाड्रन भारतीय नौदलात कार्यान्वित झाले आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत गोवा येथील ‘आयएनएस हंसा’ या तळावर ‘एएलएच एमके ३’चे पहिले स्क्वाड्रन नौदलात दाखल करून घेण्यात आले.

‘एएलएच एमके ३’ हेलिकॉप्टर्स टेहळणी, बचावकार्य व शोध मोहिमांसाठी अतिशय उपयोगी असून ही बहुउद्देशीय आधुनिक हेलिकॉप्टर्स हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने (हल) विकसित केली आहेत. या हेलिकॉप्टर्ससाठी लागणारे इंजिनही ‘हल’नेच विकसित केले आहे. या इंजिनला ‘शक्ती इंजिन’ असे नाव देण्यात आले आहे. ‘एएलएच एमके ३’ हेलिकॉप्टर्स आत्मनिर्भर भारत धोरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरत आहेत.

ही हेलिकॉप्टर्स रात्रीही मोहिमांमध्ये भाग घेऊ शकतात. या हेलिकॉप्टरवर अत्यंत आधुनिक सेेंसर्स बसविण्यात आले आहेत. तसेच टेहाळणीसाठी यावर आधुनिक रडारही तैनात करण्यात आले आहे. वैमानिकासाठी ईलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर सूट, इलेक्ट्रो ऑप्टिकल पॉड यासारख्या यंत्रणा या हेलिकॉप्टर्सवर बसविण्यात आल्या आहेत. यामुळे २६/११ सारखा हल्ला रोखता येऊ शकेल. सागरी मार्गाने होणारी घुसखोरी व संशयित हालचाली टिपण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा अत्यंत प्रभावी वापर करता येईल, असा दावा केला जातो.

याआधी ‘एएलएच एमके १’ या हेलिकॉप्टर्सची निर्मिती ‘हल’ने केली होती. तसेच पुढील टप्प्यात ‘एएलएच एमके २’ विकसित करण्यात आली. ही हेलिकॉप्टर्स ध्रुव नावाने कार्यरत असून ‘एएलएच एमके ३’ ही या ध्रुव हेलिकॉप्टर्सचीच पुढील आवृत्ती आहे. ‘हल’कडून ‘एएलएच एमके ४’ ही विकसित केली जात असून ही हेलिकॉप्टर्स ‘टुरेट गन’, ‘रॉकेट’, तसेच हवेतून हवेत आणि हवेतून जमिनिवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील.

leave a reply