चाडचे राष्ट्राध्यक्ष बंडखोरांच्या हल्ल्यात ठार

- लष्कराने चाडची सत्तासूत्रे हाती घेतली

एन’जामेना – चाडचे राष्ट्राध्यक्ष ‘इद्रिस देबी’ हे बंडखोरांच्या गोळीबारात ठार झाले आहेत. चाडची राजधानी एन’जामेनावर हल्ल्यासाठी आलेल्या बंडखोरांशी लढताना राष्ट्राध्यक्ष देबी यांचा बळी गेल्याची माहिती लष्कराने दिली. सोमवारीच राष्ट्राध्यक्ष देबी हे सहाव्यांदा निवडणूकीत विजयी ठरले होते. देबी यांच्या मृत्यूनंतर चाडमध्ये राजकीय पोकळी निर्माण होऊ नये म्हणून पुढील १८ महिन्यांसाठी देशाची सूत्रे हाती घेणार असल्याची घोषणा लष्कराने केली आहे.

गेल्याच आठवड्यात चाडमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष देबी यांचा ‘पॅट्रियॉटिक साल्वेशन मुव्हमेंट’ हा पक्ष जवळपास ७९.३ टक्के अशा मोठ्या फरकाने विजयी ठरला होता. सोमवारी देबी यांच्या या विजयाची घोषणा झाली होती. १९९० सालापासून सलग तीन दशके चाडच्या सत्तेवर असणारे देबी पुढील सहा वर्षांसाठी पुन्हा एकदा सत्तेवर येणार होते.

पण ‘फ्रंट फॉर चेंज अँड कॉन्कॉर्ड चाड’ (एफएसीटी) या उत्तर चाडमध्ये तळ असलेल्या बंडखोर संघटनेने देबी यांच्या राजवटीला कडाडून विरोध केला होता. त्याचबरोबर ११ एप्रिल रोजी निवडणुकीच्या रात्री लिबियाच्या सीमेजवळील चाडच्या लष्करी चौकीवर हल्ला चढविला. या हल्ल्याबरोबर उत्तरेकडील तिबेसी प्रांत देबी यांच्या राजवटीपासून मुक्त केल्याची घोषणा या बंडखोर संघटनेने केली. तसेच चाडमधील देबी यांचे सरकार उधळण्यासाठी राजधानी एन-जामेनावर हल्ला चढविण्याची धमकी या बंडखोर संघटनेने केली होती.

‘एफएसीटी’च्या या धमकीनंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना चाड सोडून मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. एफएसीटीचे बंडखोर राजधानी एन’जामेनाजवळ पोहोचल्याचा दावा अमेरिकेने केला होता. पण राष्ट्राध्यक्ष देबी यांनी बंडखोरांना राजधानीत घुसू न देण्याची घोषणा केली होती. लष्कराने देखील बंडखोरांचे हल्ले उधळल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, सोमवारी संध्याकाळी या बंडखोरांच्या विरोधात सुरू असलेल्या संघर्षात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष देबी लष्कराच्या चौकीवर दाखल झाले.

यावेळी झालेल्या संघर्षात राष्ट्राध्यक्ष देबी गंभीर जखमी झाल्याचे बंडखोरांनी जाहीर केले. पण लष्कराने यावर माहिती देण्याचे टाळले होते. मंगळवारी सकाळी लष्कराचे प्रवक्ते अझेम बर्मेंदाओ अगूना यांनी राष्ट्राध्यक्ष देबी यांच्या मृत्यूची बातमी सरकारी रेडिओवाहिनीवरुन जाहीर केली. तसेच दहशतवादी हल्ल्यांपासून देशाच्या सुरक्षेसाठी पुढील अठरा महिने चाडची सूत्रे लष्कराच्या कडे असतील, असेही अगूना यांनी स्पष्ट केले. लष्कराने हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून देबी यांचे पूत्र जनरल महामात काका यांना नियुक्त केले आहे.

मध्य आफ्रिका आणि साहेल प्रांतातील दहशतवादविरोधी युद्धातील सर्वात महत्त्वाचे नेते म्हणून राष्ट्राध्यक्ष देबी यांचा उल्लेख केला जातो. बोको हराम तसेच साहेलमधील अल कायदा आणि आयएस संलग्न संघटनांविरोधी कारवाईसाठी देबी यांनी मोठी भूमिका स्वीकारली होती.

leave a reply