‘साऊथ चायना सी’मधून फ्रान्सच्या आण्विक पाणबुडीची गस्त

पॅरिस – फ्रान्सच्या नौदलातील प्रगत आण्विक पाणबुडी ‘इमेराऊ’ साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून छुपी गस्त पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे. सदर सागरी क्षेत्रातील बेटांच्या वादावरुन चीन आणि शेजारी आग्नेय आशियाई देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना, फ्रेंच पाणबुडीने ही गस्त घातली. त्यामुळे इमेराऊची साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील गस्त अंशत: छुपी होती, अशी माहिती फ्रान्सच्या नौदलप्रमुखांनी दिली. साऊथ चायना सीच्या संपूर्ण क्षेत्रावर दावा सांगणार्‍या चीनकडून फ्रेंच पाणबुडीच्या या गस्तीवर प्रतिक्रिया येऊ शकते.

‘‘‘इमेराऊ’ आणि फ्रेंच विनाशिका ‘सेन’ सुमारे १९९ दिवसांची सागरी मोहीम पूर्ण करून नुकत्याच फ्रान्सच्या टॉलोन बंदरावर दाखल झाल्या आहेत. सुमारे ३० हजार सागरी मैलाच्या या प्रवासात इमेराऊ पाणबुडी आणि सेन विनाशिकेने भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया आणि अमेरिकी नौदलाबरोबरच्या युद्धसरावात सहभागही घेतला होता. आण्विक पाणबुडी आणि विनाशिकेची जवळपास सात महिन्यांची ही मोहीम फ्रान्सचे नौदलसामर्थ्य प्रदर्शित करते. तसेच येत्या काळातील दिर्घकालिन मोहिमेसाठी फ्रान्सचे नौदल तयार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे’’, असे फ्रान्सचे नौदलप्रमुख ऍडमिरल पियरे व्हॅन्डियर यांनी म्हटले आहे.

तर इमेराऊ पाणबुडीचे कमांडर अँटोइन डेलाव्यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी फ्रेंच पाणबुडीने अंशत: छुप्यापद्धतीने प्रवास केला. ‘इमेराऊ शांतपणे सदर सागरी क्षेत्रातून कसा प्रवास करील, याची काळजी पाणबुडीच्या अधिकार्‍यांनी घेतली होती. इंडोनेशियाच्या जावा आणि सुमात्रा बेटांमधील सुंदाच्या आखातातून प्रवास करण्याआधी इमेराऊ पाणबुडी सागरी पृष्ठभागावर आली होती. सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून प्रवास करणे, हेच आपल्या या मोहिमेचे उद्दिष्ट होते’, असे कमांडर डेलाव्यू म्हणाले.

फ्रान्सचे नौदलप्रमुख ऍडमिरल व्हॅन्डियर आणि फ्रान्सच्या ‘सबमरिन अँड स्ट्रॅटेजिक ओशियानिक फोर्स’चे प्रमुख वाईस ऍडमिरल जीन-फिलिप चैन्यू यांनी देखील इमेराऊ पाणबुडीच्या या प्रवासात सहभाग घेतला होता. जगभरातील नौदलांच्या हालचालींवर नजर ठेवणार्‍या एका संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. इमेराऊ साऊथ चायना सीमधून प्रवास करताना नौदलप्रमुख ऍडमिरल व्हॅन्डियर पाणबुडीत होते का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण फ्रेंच पाणबुडीने साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून पूर्ण केलेली ही गस्त चीनसाठी जबरदस्त धक्का ठरू शकते.

गेल्या काही आठवड्यांपासून ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या दोनशेहून अधिक मिलिशिया जहाजांनी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात दीड महिन्यांहून अधिक काळ तळ ठोकला होता. या काळात फिलिपाईन्सने विनाशिका आणि लढाऊ विमाने रवाना करून चीनच्या मिलिशिया जहाजांवर पाळत ठेवली होती. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीतील चीनच्या जहाजांच्या या घुसखोरीवर अमेरिकेने टीका केली. तसेच अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आपण विनाशिकांच्या ताफ्यासह या क्षेत्रात दाखल झाली होती. यामुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता.

या तणावाच्या काळात फ्रान्सच्या पाणबुडीने साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून शांतपणे केलेला प्रवास व आत्ता त्याची केलेली घोषणा चीनला अस्वस्थ करणारी ठरू शकते. फ्रान्सच्या नौदलाने केलेल्या या घोषणेवर चीनकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply