कोरोनाची साथ रोखण्यासाठी लॉकडाऊन अखेरचा पर्याय असावा

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

नवी दिल्ली – कोरोनाची साथ देशात चिंताजनकरित्या फैलावत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबोधित केले. यापुढे १८ वर्षापुढील सर्वांनाच कोरोनाची लस दिली जाईल, असे सांगून पंतप्रधानांनी यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर कोरोनाच्या साथीचा परिणाम होणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. त्याचवेळी कोरोनाची साथ रोखण्यासाठी लॉकडाऊनचा वापर अखेरचा पर्याय म्हणून करा, असा अत्यंत महत्त्वाचा संदेश पंतप्रधानांनी राज्यांना दिला आहे. कोरोनापासून बचाव करीत असताना, आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेलाही सुदृढ करायचे आहे, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.

कोरोनाची दुसरी लाट आली असून देशात दरदिवशी आढळणार्‍या रुग्णांचे प्रमाण अडीच लाखांच्याही पुढे गेले आहे. याचा फार मोठा ताण आरोग्य यंत्रणांवर आला असून रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. यावर उपाययोजना केल्या जात असून आवश्यक त्या प्रमाणात ऑक्सिजन पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचवेळी या साथीच्या काळात अहोरात्र सेवा करणार्‍या डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी, ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर्स, पोलीस दल यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ही साथ रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि आवश्यक कारण असल्याखेरीज घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. याच्या बरोबरीने देशात कोरोनच्या लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच १८ वर्षाहून अधिक वय असलेल्या प्रत्येकाला ही लस पुरविली जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

आता कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी विकसित झालेल्या लसी आहेत व आवश्यक ती वैद्यकीय साधने देखील उपलब्ध होत आहेत. यासाठी देशाच्या औषधनिर्मिती कंपन्यांनी आपले उत्पादन वाढविले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचेही कौतुक केले. मात्र असे असले तरी कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असताना, त्याचा उपजीविकेवर कमीत कमी प्रभाव पडेल, याची दक्षता घेणे भाग आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. कोरोनाची साथ रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे दावे काहीजणांकडून केले जातात. मात्र लॉकडाऊनमुळे कित्येकजणांचा रोजगार धोक्यात येतो व याचे भयंकर परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात, हे ही स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांनी केलेले हे आवाहन महत्त्वाचे ठरते.

कोरोनापासून आपला बचाव करीत असताना, आपल्याला अर्थव्यवहार ठप्प होणार नाही, याची काळजी घेणे भाग आहे. लॉकडाऊनची वेळच ओढावणार नाही, यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जनतेनेही सहकार्य करावे. राज्य सरकारांनी लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पहावे. त्याऐवजी मायक्रो लॉकडाऊन अर्थात कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागापुरता लॉकडाऊनचा पर्याय निवडावा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. देशात लसीकरणाची मोहीम आणि रोजगाराची प्रक्रिया एकाच वेळी सुरू राहिली पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

leave a reply