चीनने अण्वस्त्रनिर्मितीचा वेग वाढविला

- अमेरिकी अभ्यासगटाचा अहवाल

अण्वस्त्रनिर्मितीवॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिका व रशियाकडून अण्वस्त्रांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्‍या चीनने प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रनिर्मिती सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकी अभ्यासगट ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्’ने यासंदर्भातील नवा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात चीनकडून झिंजिआंग प्रांताच्या पूर्व भागात अण्वस्त्रांसाठी आवश्यक असणार्‍या जवळपास 110 ‘सिलोस’ची उभारणी सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या अभ्यासगटाने चीनच्या हालचालींचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत.

मारा करण्यासाठी सज्ज असणार्‍या अण्वस्त्रांसाठी उभारण्यात आलेल्या भूमिगत चेंबर्सना ‘सिलो’ म्हटले जाते. या महिन्याच्या सुरुवातीलाच ‘जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफरेशन स्टडिज्’ या अभ्यासगटाने दिलेल्या रिपोर्टमध्ये, चीनने आपल्या गान्सु प्रांतातील वाळवंटी भागात नव्या अण्वस्त्रांसाठी यंत्रणा उभारण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापाठोपाठ दुसर्‍या प्रांतातही अण्वस्त्रांसाठी यंत्रणा तयार होत असल्याचे ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्’च्या अहवालातून समोर येत आहे. गान्सु प्रांतातील ‘युमेन’च्या वायव्येला सुमारे 400 किलोमीटर्स अंतरावर असलेल्या ‘हामी’ शहरानजिक नव्या यंत्रणांची उभारणी सुरू झाली आहे. ‘सिलोस’चे बांधकाम मार्च 2021पासून सुरू झाल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला.

अण्वस्त्रनिर्मितीहामीनजिक उभारण्यात येणार्‍या ‘सिलोस’पैकी 14 ‘सिलोस’वर डोमच्या आकाराचे ‘शेल्टर्स’ बांधण्यात आले आहेत. तर 19 ‘सिलोस’साठी जमिन व्यवस्थित करून आखणी करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूला असलेली जागा व तयारी यावरून या क्षेत्रात जवळपास 110 ‘सिलोस’ची उभारणी करण्यात येईल, असा दावा अमेरिकी अभ्यासगटाने आपल्या अहवालात केला आहे. युमेन व त्यापाठोपाठ हामीमध्ये उभारण्यात येणारी यंत्रणा चीनकडून अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकण्याची सर्वात मोठी मोहीम असल्याचा दावा ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्’ने केला.

गेल्या तीन महिन्यातच चीनकडून तीन वेगवेगळ्या भागांमध्ये अण्वस्त्रांसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभारल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. इनर मंगोलिया प्रांतातील, ‘जिलांताई’ भागात 12 ते 14 ‘सिलोस’ बांधण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ या महिन्यात ‘युमेन’ व ‘हामी’मध्ये उभारण्यात येणार्‍या ‘सिलोस’ची माहिती उघड झाली आहे. या तीन ठिकाणी मिळून चीन जवळपास 240 हून अधिक ‘सिलोस’चे बांधकाम करीत आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार चीनकडे फक्त 20 ‘सिलोस’ कार्यरत आहेत. मात्र तिन्ही जागांवरील यंत्रणा उभारल्यानंतर हीच संख्या 260च्या वर जाईल.

या सर्व ‘सिलोस’मध्ये चीनने आपली अण्वस्त्रे ठेवल्यास चीनकडील अण्वस्त्रांची संख्या 400 ते 900च्या मध्ये असल्याची शक्यता असू शकते, असे अमेरिकी अभ्यासगटाने बजावले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रनिर्मिती करण्यामागे ‘न्यूक्लिअर स्ट्राईक’ची क्षमता वाढविणे, अमेरिकी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्जता ठेवणे, शत्रूदेशांवर दडपण आणणे यासारखी कारणे असू शकतात, याकडे ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्’ने अहवालात लक्ष वेधले आहे. चीन गेली काही वर्षे महासत्ता होण्यासाठी धडपडत असून, महासत्ता झाल्याचे चित्र उभे करणे हादेखील अण्वस्त्रनिर्मितीला दिलेल्या वेगामागील उद्देश असू शकतो, असा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला.

जून महिन्यात, ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’(सिप्री) या अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीनकडे 350 अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात आले होते. चीन आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वेगाने वाढ करीत असून आधुनिकीकरणाची प्रक्रियाही सुरू असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात सांगण्यात आले होते.

leave a reply