पाकिस्तानच अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार

- अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह

अमरुल्ला सालेहकाबुल – ‘पाकिस्तानने प्रचारतंत्राद्वारे कितीही करामती केल्या तरी यामुळे वास्तव आणि माझ्या देशातील पाकिस्तानची प्रतिमा सुधारणे शक्य नाही. कारण अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यांचा सूत्रधार, सहाय्यक आणि मालक पाकिस्तानी लष्कर आहे व हेच वास्तव आहे’, असे घणाघाती प्रहार अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी केले. अफगाणिस्तानचे नेते आपल्या अपयशाचे खापर पाकिस्तानवर फोडत आहेत, अशी टीका पाकिस्तानचे सरकार व आजी-माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. मात्र अफगाणिस्तानात तालिबान घडवित असलेल्या रक्तपाताला दुसरे कुणीही नाही, तर पाकिस्तानच जबाबदार आहे, असे अफगाणिस्तान ठासून सांगत असून याचे आंतरराष्ट्रीय परिणाम दिसू लागले आहेत.

अमरुल्ला सालेहगेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे नेते व लष्कराच्या प्रभावाखालील माध्यमे अफगाणिस्तानातील अश्रफ गनी सरकारला लक्ष्य करीत आहेत. तालिबान वाटाघाटीसाठी तयार असले तरी राष्ट्राध्यक्ष गनी यांना सत्ता सोडायची नसल्याचा आरोप पाकिस्तानातून केला जातो. त्याचबरोबर तालिबान आणि पाकिस्तानमध्ये कुठलेही सहकार्य नसल्याचा दावा पाकिस्तानचे नेते करीत आहेत. याउलट अफगाणींसाठी पाकिस्तानने दिलेल्या बलिदानाचे दाखले पाकिस्तानी नेते व माध्यमांकडून दिले जातात.

आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तान करीत असलेल्या या प्रयत्नांवर अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी ताशेरे ओढले. पाकिस्तानने कितीही मोठा प्रचारतंत्र राबविले तरी वास्तव आणि अफगाणींमध्ये पाकिस्तानची असलेली प्रतिमा कधीच सुधारणार नसल्याचे सालेह यांनी ठणकावले. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील अस्थैर्यासाठी पाकिस्तानचे लष्कर जबाबदार असल्याचा आरोप सालेह यांनी नव्याने केला.

अमरुल्ला सालेहअफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी रहमतुल्ला नबिल यांनी देखील सालेह यांच्या पाकिस्तानवरील आरोपांना दुजोरा दिला. दरदिवशी एक हजार पाकिस्तानी दहशतवादी अफगाणिस्तानात हिंसाचार घडविण्यासाठी घुसखोरी करतात, असा ठपका नबिल यांनी ठेवला. तर पाकिस्तानातील तालिबानचा प्रमुख नूर वली महसूद याने अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अफगाणिस्तानातील संघर्षात आपले सहा हजार दहशतवादी सहभागी असल्याचे मान्य करून पाकिस्तानची कोंडी केली.

दरम्यान, अफगाणी लष्कराचा राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास राहिलेला नाही व म्हणून 46 अफगाणी जवानांनी पाकिस्तानात आश्रय घेतल्याचा दावा पाकिस्तान करीत आहे. पण पाकिस्तानने अफगाण सरकारविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराचा हा एक भाग असल्याचा दावा अफगाणी व आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply