चीनने भारतीय सीमेजवळील रेल्वे प्रकल्पाचा वेग वाढविला

बीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अरुणाचल प्रदेशच्या जवळून जाणार्‍या तिबेटमधील लिंझीला जोडणार्‍या नवीन रेल्वे प्रकल्पाचे काम काम जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुमारे ४७.८ अब्ज डॉलर्सचा हा संपूर्ण रेल्वेप्रकल्प सीमाभागातील स्थिरतेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केला. चीनने तिबेटच्या भूभागात पाच विमानतळांची उभारणी केली असून यामध्ये लिंझी येथील विमानतळाचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेशजवळच्या याच लिंझी शहरापर्यंत रेल्वे लाईन टाकून चीनची कम्युनिस्ट राजवट भारताला नवी चिथावणी देत आहे.

रेल्वे प्रकल्प

आगामी काळातील चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा तिबेटवर राज्य करण्याच्या सर्वसाधारण योजनेचा प्रमुख उपाय म्हणून तिबेटमधील हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगून जिनपिंग यांनी या प्रकल्पाचा पुरस्कार केला. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण, वांशिक एकता आणि सीमाभागातील स्थैर्य टिकविण्यासाठी सदर प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. या रेल्वेप्रकल्पामुळे सिचुआन-तिबेट भागाच्या आर्थिक विकासाबरोबर सीमाभागातील सुरक्षेच्या दृष्टीने देखील सदर रेल्वेप्रकल्प महत्त्वपूर्ण असल्याचे चीनच्या सरकारी मुखपत्राने म्हटले आहे.

भारत-चीन यांच्यातील सीमावादात ३,४८८ किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा समावेश आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या सीमेचा समावेश असून अरुणाचल हा आपल्या दक्षिण तिबेटचा भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. तर भारताने अरुणाचलवरील चीनचा दावा वारंवार फेटाळला आहे. त्याचबरोबर भारतानेही अरुणाचलच्या सीमेवरील पायाभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. तर चीनने अरुणाचलच्या सीमेजवळ रेल्वे लाईन टाकून आपल्या लष्करी हालचाली वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

लडाखच्या ‘एलएसी’वरील तणाव कायम असून उभय देशांचे राष्ट्रप्रमुख या महिन्यात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये किमान चार वेळा आमनेसामने येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, जिनपिंग यांनी अरुणाचल सीमेजवळून जाणार्‍या रेल्वे प्रकल्पाचा वेग वाढविण्याच्या सूचना देऊन भारताला चिथावणी दिल्याचे दिसत आहे.

leave a reply