भारतीय जहाज पाच महिन्यांपासून चीनच्या बंदरात अडकले

- २३ भारतीय खलाशांच्या सुटकेसाठी आवाहन

नवी दिल्ली – गेल्या पाच महिन्यापासून भारतीय मर्चंट नेव्हीचे ‘जग आनंद’ हे जहाज चीनने आपल्या ‘जिंगटॅंक’ बंदरात अडवून ठेवले आहे. या जहाजावरील २३ भारतीय खलाशी असून यातील बहुतांश जणांची तब्येत बिघडू लागल्याचे वृत्त आहे. जूनमध्ये लडाखच्या गलवानमध्ये झालेल्या संघर्षाच्या दोन दिवस आधी हे जहाज ऑस्ट्रेलियातून १.७० लाख टन कोळसा घेऊन चीन बंदरात पोहोचले होते. मात्र गलवानमधील संघर्षानंतर चिनी अधिकारी हा कोळसा उतरवून घेण्याची परवानगी देण्यास टाळत असून भारतीय मर्चंट नेव्हीच्या खलाशांना मानसिक छळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या खलाशांची सुटका करण्याचे आवाहन भारत सरकारकडे करण्यात आली आहे.

भारतीय जहाज

भारत आणि चीनमधील वाढलेल्या तणावामुळे २३ भारतीय खलाशी असलेले मर्चंट नेव्हीचे ‘जग आनंद’ हे जहाज जूनपासून चिनी बंदरात अडकले आहे. मुंबईच्या ग्रेट ईस्टर्न शिपिंग लिमिटेडचे हे जहाज १३ जून रोजी ऑस्ट्रेलियातून वाहून आणलेला १.७० लाख टन कोळसा घेऊन ‘जिंगटॅंक’मध्ये दाखल झाले होते. यावेळी लडाखमधील चीनने केलेल्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. तर १५ जूनच्या रात्री गलवानमध्ये चिनी जवानांनी भारतीय सैनिकांवर विश्वासघाताने हल्ला चढविला होता. यावेळी भडकलेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते आणि चीनचे ४० जवान ठार झाले होते. यानंतर चिनी अधिकारी सतत ‘जग आनंद’ जहाजातून माल उतरविण्याची परवानगी देण्याचे टाळत आहेत, असे माहिती उघड झाली आहे.

‘जग आनंद’ जहाजावरील खाण्यापिण्याचे सामान, औषधे आणि इतर साहित्य संपत आले असून गेल्या पाच महिन्यापासून चीनच्या परवानगी अभावी या जहाजात अडकून पडलेले खलाश्यांची तब्येत बिघडू लागली आहे. चीनच्या अधिकाऱ्यांशी सतत चर्चा सुरुआहे. मात्र अजून कोणताही तोडगा निघालेला नाही, असे ग्रेट ईस्टर्न शिपिंग लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जहाजावरील खलाशांना घरी परतायचे असून कोणीही आपली दखल घेत नसल्याची तक्रार हे खलाशी करीत आहेत. कंपनी आणि खलाशांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

leave a reply