चीनच्या पहिल्या ॲम्फिबिअस युध्दनौकेला आग – जीवितहानी नाही 

बीजिंग – चीनच्या पहिल्या ‘टाइप०७५’ ॲम्फिबिअस  विमानवाहू युध्दनौकेला शनिवारी आग लागली. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र ‘टाइप ०७५’चे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.  पुढील काही दिवसांमध्ये  ‘टाइप ०७५’ युध्दनौका चीनी नौदलाच्या ताफ्यात  दाखल होणार होती. पण ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे.

‘टाइप०७५’ युध्दनौका चाचण्यांसाठी सज्ज होती. पण त्याआधी युध्दनौकेला आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.  चीन आपल्या संरक्षणक्षेत्राशी निगडीत असलेल्या दुर्घटना जगजाहीर करण्यासाठी उत्सुक नसतो. त्यामुळे पुढच्या काळातही या आगीचे कारण जगासमोर येण्याची शक्यता नाही.

चीनच्या हुडॉंग-होंगुआ शिपयार्डमध्ये ‘टाइप०७५’च्या दुसर्या जहाजाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. अमेरिकेच्या १०डब्ल्यूएएसपी’च्या धर्तीवर चीनची  ‘टाइप०७५’ची निर्मिती सुरू आहे. या  युद्धनौकेवर  एकाच वेळी विमाने आणि हेलिकॉप्टर्स उतरवता येऊ शकतात. ‘टाइप०७५’ युध्दनौका चीनच्या संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावू शकते, असा दावा केला जातो.

साऊथ चायना सी,  ईस्ट चायना सी यांच्यासह आशिया प्रशांत क्षेत्रात, पॅसिफिक क्षेत्रात चीन व अमेरिकेच्या नौदलांची व अमेरिकेचे हितसंबंध यांचा टकराव होत आहे. दोन्ही देशांचे नौदल एकमेकांसमोर खडे ठाकल्याच्या कितीतरी घटना समोर आल्या होत्या. यातून संघर्षाचा भडका उडू शकतो व या संघर्षातून घनघोर युद्ध पेटेल,अशी चिंता जगभरातील विश्लेषकांनी व्यक्त केली होती. चीनने अमेरिकेबरोबरील या संभाव्य संघर्षाची तयारी केली असून यासाठी चीनने आपल्या नौदलाचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढविले आहे.

‘टाइप०७५’ युध्दनौकेची निर्मिती हा याच चीनच्या अमेरिकाविरोधी तयारीचा भाग असल्याचे दिसते.  असे असले तरी चीनी नौदलाच्या मर्यादा असून चीनकडे अमेरिकेला आव्हान देण्याची क्षमता आलेली नाही, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. ‘टाइप०७५’ वर लागलेली आग व याबाबत चीन पाळत असलेलेच मौन पाहता हीच बाब अधोरेखित करत असल्याचे दिसते.

leave a reply