कोरोनाव्हायरसच्या साथीचा लाभ घेऊन लश्कर, जैश व हिजबुल दहशतवाद्यांची भरती वाढवतील – ‘साऊथ एशिया डेमोक्रॅटिक फ्रंट’चा इशारा

ब्रुसेल्स – आधीच संकटात सापडलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे रसातळाला जाणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. यामुळे पाकिस्तानचे सरकार आणि जनता हवालदिल झाली असले तरी दहशतवादी संघटनांसाठी मात्र यामुळे नवीन संधी चालून आल्याचे दिसते. ब्रुसेल्सस्थित ‘साऊथ एशिया डेमोक्रॅटिक फ्रंट’ नावाच्या अभ्यास गटाने ही चिंता व्यक्त केली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील वाढत्या बेरोजगारीचा लाभ घेऊन ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिदीन’ या संघटना जिहादांची भरती वाढवतील, असे या अभ्यास गटाने म्हटले आहे.

दहशतवाद हाच पाकिस्तानमध्ये सदासर्वकाळ तेजीत चालणारा धंदा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे .कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला येत असून पुढच्या काळात या देशात बेरोजगारी थैमान घालणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. ही बेरोजगारी वाढत असताना वैफल्यग्रस्त तरुणांना पैशांचे आमिष दाखवून लश्कर, जैश व हिजबुल या दहशतवादी संघटना आपल्या जाळ्यात ओढू शकतात,अशी चिंता ‘साऊथ एशिया डेमोक्रॅटिक फ्रंट’चे संचालक ‘सिंगफिल्ड वोल्फ’ यांनी व्यक्त केली.

याआधीही बेरोजगारी व इतर संकटे यांचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी जिहादच्या भरतीला वेग दिल्याचे समोर आले होते. याची आठवण वोल्फ यांनी करून दिली. या भरतीसाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनाना पैशांची कधीही कमतरता भासली नव्हती, हेही अनेकवार स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या दहशतवादी संघटना पाकिस्तान व अफगाणिस्तानातील तरुणांना पैशाच्या बळावर आपले सदस्य होण्यास भाग पडतील. व पुढच्या काळात त्यांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करू शकतील.

भारताच्या सुरक्षा दलांनी गेल्या दोन वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये हाती घेतलेल्या आक्रमक कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. या दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्यासाठी तरुण उत्सुक नसल्याचे दिसत आहे. दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांचे आयुष्य तुमच्या वाट्याला येईल, असा संदेश भारतीय लष्कराकडून दिला जात आहे. व त्याचा परिणामही स्पष्टपणे दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत नवे दहशतवादी तयार करणे पाकिस्तानातील लश्कर आणि जैश व हिजबुल साठी अवघड बनले आहे. यामुळे पाकिस्तानच्या जनतेसमोर आलेले आर्थिक संकट दहशतवादी संघटनांसाठी मोठी संधी ठरते. याचा लाभ उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न या दहशतवादी संघटनांकडून केला जाऊ शकतो. मात्र पुढच्या काळात याचे दुष्परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागणार आहेत. कारण या दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंद्र असल्याचा आरोप नव्याने सिद्ध होईल. यामुळे दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या व दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाने कठोर कारवाई करावी ही मागणी भारत अधिक आक्रमकपणे करू शकतो.

leave a reply