चीन, पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये

- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले

नवी दिल्ली – ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग असून चीन व पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये’, अशा खरमरीत शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीन आणि पाकिस्तानला फटकारले. काही तासांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काश्मीरच्या मुद्यावर तसेच ‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर भारताने आपल्या दोन्ही शेजारी देशांना फटकार लगावली.

अंतर्गत कारभारात हस्तक्षेप

काश्मीरप्रश्नी सौदी अरेबियाचे समर्थन मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर आणि सौदीकडून अपमानित झाल्यानंतर पाकिस्तानने चीनकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी हे दोन दिवसांच्या चीन दौर्‍यावर गेले होते. ‘साऊथ चायना सी’च्या हैनात बेटावर पार पडलेल्या या बैठकीत चीनने पाकिस्तान हा आपला ‘आयरन ब्रदर’ असल्याचे म्हटले. तसेच पाकिस्तानने आपल्या देशहितासाठी स्वतंत्र मार्गाचा अवलंब करावा, असे चीनच्या परराष्ट्रमंत्री म्हणाले. तर काश्मीर हा वादग्रस्त मुद्दा असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे पालन करुन सदर प्रश्न चर्चेद्वारे सोडवावा, असे दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात प्रसिद्ध करण्यात आले.

चीन आणि पाकिस्तानच्या बैठकीत झालेल्या काश्मीरच्या मुद्यावर संताप व्यक्त करुन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याचा खरपूस समाचार घेतला. ‘चीन-पाकिस्तानच्या बैठकीत काश्मीरच्या मुद्याचा उल्लेख भारताला अजिबात मान्य नाही. याआधीही भारताने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचबरोबर भारताच्या हद्दीतून जाणार्‍या सीपीईसी प्रकल्पालाही भारताचा विरोध आहे’, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव फटकारले. ‘सीपीईसी’ प्रकल्प हा पाकिस्तानने बळकावलेल्या भारताच्या भूभागातून जात असल्याची जाणीव श्रीवास्तव यांनी करुन दिली. याआधीही भारताने सीपीईसी तसेच काश्मीर बाबत स्पष्ट भूमिका स्वीकारली होती.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. या दौर्‍यात सौदीची नाराजी दूर करून काश्मीरप्रश्नी समर्थन मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्‍न पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केला होता. पण क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भेट नाकारल्यामुळे जनरल बाजवा यांना सौदीच्या दौर्‍यातून अपमानित होऊन रिकाम्या हाताने परतावे लागले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला भेट दिली. पण या भेटीतही पाकिस्तानच्या पदरी अपमानच आल्याची टीका पाकिस्तानी माध्यमेच करू लागली आहेत. परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्या स्वागताला चीनने परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी रवाना न करता, पोलीस काँस्टेबल रवाना केल्याची टीका पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कुरेशी यांची भेट नाकारल्याची चर्चाही पाकिस्तानी माध्यमांमध्ये होत आहे.

leave a reply