इंधनाच्या साठ्यांसाठी तुर्की भूमध्य सागरातील हालचाली वाढविणार  

- राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची धमकी

इस्तंबूल – दोन आठवड्यांपूर्वी तुर्कीने ग्रीसच्या सागरी हद्दीनजिक पाठविलेल्या जहाजावरून निर्माण झालेला तणाव कायम असतानाच, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी नवी धमकी दिली आहे. यावर्षाच्या अखेरीपर्यंत तुर्की भूमध्य सागरात अजून एक जहाज तैनात करणार असून इंधनाच्या साठ्यासाठी मोहिमांची व्याप्ती वाढविल, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली. भूमध्य सागरातील नव्या मोहिमेच्या माध्यमातून चिथावणी देणाऱ्या तुर्की राष्ट्राध्यक्षांनी, ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात तब्बल ३२० अब्ज घनमीटर इतका नैसर्गिक इंधनवायू साठा सापडल्याची घोषणाही केली. याच पार्श्वभूमीवर, युरोपने तुर्कीच्या भूमध्य सागरातील महत्त्वाकांक्षांना वेसण घालण्याची वेळ आली आहे असा इशारा, ग्रीक विश्लेषकांनी दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन

दोन आठवड्यांपूर्वी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचवणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात, असा इशारा ग्रीसने दिला होता. अमेरिकेसह युरोपीय महासंघ व नाटोनेही तुर्कीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली होती. तुर्कीच्या कारवायांमुळे तणाव वाढल्याने फ्रान्सने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करून फ्रान्सने ‘ला फाएत’ ही विनाशिका व रफायल विमाने तैनात केली होती.

मात्र तुर्कीचे आपली मोहीम चालूच ठेवल्याने या क्षेत्रातील तणाव चांगलाच चिघळला होता. आता वर्षअखेरीस नवे जहाज पाठवून पुन्हा सागरी मोहिमेचे संकेत देत तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यात अधिकच भर टाकली आहे. शुक्रवारी इस्तंबुलमधील एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी, ‘कानुनी’ नावाचे नवीन जहाज भूमध्यसागरी क्षेत्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्याचवेळी तुर्कीने ब्लॅक सी सागरी क्षेत्रात इंधनसाठयांसाठी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याचेही एर्दोगन यांनी जाहीर केले.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन

तुर्कीच्या ‘फतिह’ या जहाजाला ३२० अब्ज घनमीटर नैसर्गिक इंधनवायू साठ्याचा शोध लागल्याचे त्यांनी सांगितले. तुर्कीच्या इतिहासात सापडलेला हा सर्वात मोठा साठा असल्याचेही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन म्हणाले. येत्या तीन वर्षात यासाठयांमधून इंधनाचे उत्खनन सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला. इंधनक्षेत्रात निर्यातदार देश म्हणून स्थान मिळेपर्यंत तुर्की आपल्या मोहिमा थांबविणार नाही, असा इशाराही एर्दोगन यांनी यावेळी दिला.

दरम्यान, तुर्कीच्या या वाढत्या कारवायांवर ग्रीसमधून चिंतेचे सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. भूमध्य सागरातील तुर्कीच्या हालचाली हा आता द्विपक्षीय मुद्दा राहिला नसून युरोपीय देशांनी एर्दोगन यांच्या महत्त्वाकांक्षांना वेसण घालण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करायला हवा, असा इशारा ग्रीक विश्लेषक मार्को विसेंझिनो यांनी दिला.

leave a reply