तैवानच्या हद्दीत घुसखोरीद्वारे चीन बायडेन प्रशासनाचा अंदाज घेत आहे

- अमेरिकी विश्‍लेषक गॉर्डन चँग

बीजिंग/वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अमेरिकेची सत्तासूत्रे स्वीकारीत असतानाच, चीनची लढाऊ विमाने तैवानच्या हवाई हद्दीत सातत्याने शिरकाव करीत आहेत. हा योगायोग नाही, तर त्यामागे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा डाव आहे. या घुसखोरीद्वारे जिनपिंग राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन आपल्या विरोधात किती कठोर भूमिका स्वीकारील, याचा अंदाज घेत आहे, असे अमेरिकेतील चिनी वंशाचे विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी बजावले आहे.

गेल्या आठवड्याभरात चीनने तैवान तसेच भारताच्या विरोधातील आपल्या हालचाली अधिक आक्रमक केल्या आहेत. तैवानच्या हवाईहद्दीत लढाऊ विमाने, बॉम्बर्स तसेच टेहळणी विमानांची घुसखोरी चीनने घडविली आहे. तसेच तैवानच्या हवाई हद्दीजवळ चीनने युद्धसरावही आयोजित केला होता. भारताच्या सिक्कीमच्या ‘एलएसी’जवळही चीनच्या जवानांनी कुरापती केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. गेल्या आठवड्यात ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत असताना, चीनने या आक्रमक कारवाया केल्या होत्या. चीनच्या या कारवायांवर अभ्यास करणारे अमेरिकेतील विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी एका मुलाखतीत महत्त्वाचा उलगडा केला. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे आधीच्या राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत किती आक्रमक आहेत, याची चाचणी चीन घेत असल्याचे चँग यांनी म्हटले आहे. २०१७ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली, तेव्हा चीनने अशाप्रकारे तैवानच्या हद्दीजवळ युद्धसराव केला नव्हता, याची आठवण चँग यांनी करून दिली.

गेल्या आठवड्यात शनिवार आणि रविवार, असे सलग दोन दिवस चीनने तैवानच्या हवाईहद्दीत युद्धसरावाचे आयोजन करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना आजमविण्याचा प्रयत्न केला, असा दावा चँग यांनी केला. अमेरिकेतील अनेकजण हेच बोलत असल्याचे चँग म्हणाले. चीनने याआधीही युद्धसरावांचे आयोजन करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, बराक ओबामा यांना आजमावले होते. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत चीनने तशी चूक केली नाही. कारण चीन ट्रम्प यांच्याविषयी टरकून होता, असे चँग यांनी मुलाखतीत सांगितले.

तर चीनचे एलाईट अर्थात उच्चपदस्थ उघडपणे बायडेन यांना आपण भीत नसल्याचे म्हटल्याची चँग यांनी आठवण करून दिली. त्यामुळे बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी चीनच्या राजवटीची वाढती आक्रमकता सर्वाधिक धोकादायक ठरेल, असा इशारा चँग यांनी दिला.

दरम्यान, चीनने देखील तैवानच्या हद्दीतील आपल्या विमानांची घुसखोरी योग्य ठरविली आहे. तसेच ‘स्वतंत्र तैवानच्या प्रयत्नात असलेले गट आगीशी खेळत असून ते या आगीत होरपळतील. तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाची घोषणा ठरते’, अशा शब्दात चीनच्या संरक्षण मंत्रालयाने तैवानसह अमेरिकेला धमकावले आहे.

leave a reply