भारत-जपान ‘अ‍ॅक्ट ईस्ट फोरम’ची बैठक

- ईशान्य भारतातील प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा

नवी दिल्ली – ‘भारत-जपान अ‍ॅक्ट ईस्ट फोरम’ची पाचवी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ईशान्य भारतात दोन्ही देशांद्वारे उभारण्यात येणार्‍या संयुक्त प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. भारत-जपान ‘अ‍ॅक्ट ईस्ट फोरम’अंतर्गत (एईएफ) ईशान्य भारतात कित्येक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जपानने गुंतवणूक केली आहे. भारताचे अ‍ॅक्ट ईस्ट धोरण आणि जपानच्या मुक्त ‘इंडो-पॅसिफीक व्हिजन’अंतर्गत ‘एईएफ’द्वारे ईशान्य भारतात दोन्ही देशांमधील सहाकार्याची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. ईशान्य भारतात जपानच्या गुंतवणुकीवर चीनने याआधी आक्षेप घेतले होते. भारत-चीनमधील सीमावादात हा तिसर्‍या पक्षाचा हस्तक्षेप असल्याची प्रतिक्रिया तीन वर्षांपूर्वी चीनने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर चीनबरोबर तणाव सुरू असताना भारत-जपानने ईशान्य भारतातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेला आढावा महत्त्चाचा ठरतो.

ईशान्य भारतात जपानने कितीतरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. २०१७ साली जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्या भारत दौर्‍यात यासंबंधीच्या कारारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या व ‘एईएफ’ची स्थापना करण्यात आली होती. ईशान्य भारताचा विकास करण्याच्या दृष्टीने ‘एईएफ’चे व्यासपीठ तयार करून जपानने याअंतर्गत ईशान्य भारतात हजारो कोटी रुपयांच्या गुुंतवणुकीची घोषणा केली होती.

यानुसार संपूर्ण ईशान्य भारतात ‘कनेक्टिव्हीटी’ प्रोजेक्टवर काम करण्यात येत आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्प व इतर पायाभूत विकास प्रकल्पाच्या उभारणीसाठी जपान भारताला सहकार्य करीत आहे. याशिवाय ईशान्य भारतात आरोग्य सुविधा प्रकल्पांमध्येही जपान भारताला सहकार्य करीत असून बांबू मूल्यवर्धीत साखळी मजबूत करण्यासाठीही जपान सहाय्य करीत आहे. ईशान्य भारतात जपानचे सहकार्य अतिशय महत्त्वाचे असून दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना पुढे घेऊन जाणारे आणि परस्पर विश्‍वास वाढविणारे असल्याचे जपानाच्या राजदूतांनी म्हटले आहे.

जपानव्यतिरिक्त अलिकडेच इस्रायलनेही ईशान्य भारतात गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने ईशान्य भारतासाठी स्वतंत्र वाणीज्य राजदूतांची नेमणूक केली होती. ईशान्य भारतात होत असलेला विकास, येथे वेगाने सुरू असलेले पायाभूत प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हीटीमुळे चीनची अस्वस्थता वाढली आहे. याआधी चीनने भारत जपानच्या इशान्य भारतातील सहकार्यावर आक्षेप नोंदविले होते. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच झालेली ‘एईएफ’ बैठक महत्त्वाची ठरते.

leave a reply