उत्तर प्रदेशात गुन्हेगार टोळीच्या हल्ल्यात आठ पोलीस शहिद

कानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विकास दुबे या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याच्या टोळीतील गुंडानी केलेल्या हल्ल्यात आठ पोलीस शहीद झाले. यामध्ये चार पोलीस अधिकारी आहेत. तसेच पाच ते सात जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद पोलिसांना आदरांजली वाहताना गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विकास दुबे सध्या फरार असून त्याचा मामा आणि एक साथीदार चकमकीदरम्यान ठार झाला आहे.

Uttar-Pradeshकानपूरपासून दीडशे किलोमीटर दूर असलेल्या डिकरु गावात आजूबाजूच्या तीन पोलीस स्थानकांचे एकत्रित पथक विकास दुबे या कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते. ६० हून अधिक गंभीर गुन्हे असलेल्या विकास दुबेवर नुकत्याच झालेल्या एका हत्येत हात असल्याच्या आरोप होता. मात्र पोलीस विकास दुबेला पकडण्यासाठी येत असल्याची खबर आधीच त्याच्या टोळीला मिळाली होती. त्यामुळे गावात येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी अडथळे टाकून ठेवण्यात आले होते. पोलीस हे अडथळे पार करीत गावात पोहोचली. मात्र त्यानंतर दबा धरून बसलेल्या विकास दुबे आणि त्याच्या गुंडानी चारी बाजूने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. घरांच्या छतांवर लपलेले गुंड पोलिसांवर बेछूट गोळीबार करीत होते. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांना प्रत्युत्तर करण्याची संधी मिळाली नाही.

यावेळी पोलीस आणि या टोळीमध्ये उडालेल्या चकमकीत आठ पोलिसांना वीरमरण आले. यामध्ये एक पोलीस उपाधिक्षक आणि तीन पोलीस उपनिरक्षकांचा समावेश आहे. चकमकीत सुमारे सहा ते सात जवान जखमी झाले आहेत. यानंतर घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली. मात्र तोपर्यंत दुबे आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. या भागात पोलिसांना एके-४७ रायफलचे बॉक्सेस मिळाले. तसेच या हल्लेखोरांनी पोलिसांची शस्त्रे पळविल्याचे स्पष्ट झाले आले.

त्यामुळे या भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे व विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. यावेळी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या जंगलात पोलिसांनी दोन हल्लेखोरांना चकमकीत ठार केले आहे. पोलिसांनी घटनस्थळावरून शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये पोलिसांकडून पळवून नेलेल्या एका शस्त्राचा समावेश आहे. हे दोन्ही हल्लेखोर विकास दुबे याचे नातलग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याच जंगलात तीन हल्लेखोर लपल्याची माहिती मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी विकास दुबेला पकडण्यासाठी कानपूर शहरासह ग्रामीण भाग व आसपासच्या जिल्ह्यातही छापे टाकायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास दुबेच्या एका साथीदाराला अटक केली आहे. तसेच कानपूरला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांची तपासणी केली जात आहे.

leave a reply