चीनने करारांचे उल्लंघन केल्यामुळेच एलएसीवर तणाव

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे टीकास्त्र

कॅनबेरा – भारत व चीनदरम्यान एलएसीवर निर्माण झालेल्या तणावाला चीनने लेखी करारांकडे केलेले उल्लंघन जबाबदार आहे, अशी टीका भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली. जेव्हा एखादा मोठा देश लेखी वचने पाळत नाही, तेव्हा ती आंतरराष्ट्रीय समुदायासाठीही चिंतेची बाब ठरते असे सांगून एस. जयशंकर यांनी चीनला लक्ष्य केले. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांच्या या भूमिकेला ऑस्ट्रेलियानेही दुजोरा दिला आहे.

चीनने करारांचे उल्लंघन केल्यामुळेच एलएसीवर तणाव - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे टीकास्त्रशुक्रवारी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये पार पडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीतही चीनच्या वर्चस्ववादाचा मुद्दा ऐरणीवर होता. एस. जयशंकर यांच्या विधानातून त्याची झलक मिळत आहे. शनिवारी एस. जयशंकर व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मारिस पेन यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना चीनबाबत प्रश्‍न विचारण्यात आला.

‘क्वाडच्या बैठकीत भारत-चीन संबंधांच्या मुद्यावर चर्चा झाली. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा भाग असलेल्या देशांना चीनच्या हालचालींबाबत सजग राहणे आवश्यक असल्याने त्याबद्दल बोलणी झाली. सीमाभागात सैन्याची जमवाजमव करायची नाही याबाबत भारत व चीनमध्ये लेखी करार झाला होता. २०२० साली चीनने या कराराचे उल्लंघन केले व त्यामुळे एलएसीवर तणाव निर्माण झाला. जेव्हा एखादा मोठा देश लेखी वचनांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय समुदायासाठीही चिंतेचा व लक्ष वेधून घेणारा मुद्दा ठरतो’, या शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनवर टीका केली.

यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनकडून ‘क्वाड’वर करण्यात येणार्‍या टीकेचाही समाचार घेतला. ‘चीन गेल्या अनेक दिवसांपासून क्वाडविरोधात नाराजीची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. क्वाड कोणाच्याही विरोधात नाही.इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्व देशांना कोणत्याही धोक्याविरोधात सार्वभौम व सुरक्षित राहता येईल, यासाठी विश्‍वास वाढविण्याचे काम क्वाडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. चीनच्या टीकेमुळे क्वाडचे महत्त्व कमी होत नाही’, असा टोला एस. जयशंकर यांनी लगावला.

दरम्यान, भारत व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत द्विपक्षीय सायबर सहकार्यावर चर्चा पार पडली. तसेच दोन देशांमधील शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील संबंध वाढविण्यासाठी ऑस्ट्रेलियाने काही नव्या उपक्रमांचीही घोषणा केली आहे.

leave a reply