अरुणाचल प्रदेशमधील बेपत्ता युवक सापडल्याचा चीनचा दावा

- भारताकडे सोपविण्याची तयारी

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरून गायब झालेल्या युवकाचा शोध लागल्याचे चीनच्या लष्कराने म्हटले आहे. त्याला भारताकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही चीनच्या लष्कराने दिल्याचे दावे केले जातात. या युवकाचे अपहरण चीनच्या लष्करानेच केले होते, असे आरोप करण्यात येत होते. पण चीनने हे आरोप अमान्य केले. त्याचवेळी या बेपत्ता झालेल्या युवकाचा वापर करून चीनने अरुणाचल प्रदेशवर पुन्हा एकदा आपला दावा ठोकला होता.

अरुणाचल प्रदेशमधील बेपत्ता युवक सापडल्याचा चीनचा दावा - भारताकडे सोपविण्याची तयारीमिरान तारोन नावाचा युवक १८ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशच्या अपर सियांग जिल्ह्याजवळून बेपत्ता झाला होता. मिरानचा मित्र असलेल्या जॉनी येईंग याने स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार मिरानचे चीनच्या लष्कराने अपहरण केले होते. तिबेटमध्ये भारतात वाहणार्‍या सँग्पो नदीजवळ हे अपहरण झाल्याची माहिती येईंग याने दिली. या नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग म्हटले जाते, तर देशभरात या नदीला ब्रह्मपुत्रा म्हटले जाते. मिरानसाठी भारतीय सैन्याने शोधमोहीम हाती घेतली होती. तसेच चीनच्या लष्करालाही याबाबत विचारणा करण्यात आली.

मिरानचे चिनी लष्कराने अपहरण केल्याच्या बातम्या भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले होते. तसेच अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचा दावा करण्याची संधी यानिमित्ताने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने साधली. मात्र भारताने त्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे हा वाद वाढविण्याचा चीनचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्याचवेळी भारतीय सैन्याने देखील हे प्रकरण शांतपणे हाताळल्याने यावर वाद माजवून भारताला अडचणीत टाकण्याचा चीनचा डाव अपयशी ठरला. आता चीनच्या लष्कराने आपल्याला मिरानचा शोध लागल्याचे म्हटले आहे. लवकरच या युवकाला भारतीय सैन्याच्या हवाली केले जाईल. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू झाल्याचे चीनच्या लष्कराने म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा चीन भारताच्या विरोधात मानसिक दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. भारतात खळबळ माजविण्यासाठी चीनची ही सारी धडपड सुरू असल्याचे दिसते. मात्र भारत सरकार तसेच लष्कराने चीनचा हा डाव ओळखून हे प्रकरण अत्यंत संयमाने हातळले.

२०२० साली चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशच्या सुबानसिरी जिल्ह्यातून पाच तरुणांचे अपहरण केले होते. त्यानंतर आठवडाभराने त्यांची सुटका केली होती. त्यामुळे अशा कुरापतखोर कारवाया करून चीन भारतावरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न याआधीही करीत आल्याचे दिसते. दोन्ही देशांमध्ये सीमेची व्यवस्थितपणे आखणी झालेली नाही. याचा लाभ घेऊन चीनचे लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या एलएसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते. असे प्रकार टाळण्यासाठी भारताने चीनला सीमेच्या आखणीचा प्रस्ताव दिला होता. पण चीन त्याला तयार नाही.

leave a reply