…तर चीनही सोव्हिएत रशियाप्रमाणे कोसळेल

- कम्युनिस्ट राजवटीच्या सल्लागारांचा इशारा

सोव्हिएत रशियाप्रमाणे कोसळेलबीजिंग – दीर्घकालिन सुरक्षेचा विचार न करता देशातील प्रत्येक बाब राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून त्यामागे आंधळेपणाने धावत राहिलात, तर चीनही सोव्हिएत रशियाप्रमाणे कोसळेल, असा गंभीर इशारा चीनचे वरिष्ठ सल्लागार जिआ किन्गुओ यांनी दिला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील चीनचे माजी राजदूत कुई तिआन्कि यांनी, ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’ चीनला महागात पडेल, असे बजावले होते. त्यापाठोपाठ किन्गुओ यांनी दिलेला इशारा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आक्रमक व चुकीच्या धोरणांमुळे चीनच्या राजनैतिक वर्तुळात निर्माण झालेली अस्वस्थता दाखवून देणारा ठरतो.

जिआ किन्गुओ हे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे सल्लागार मंडळ म्हणून कार्यरत असणार्‍या ‘पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स’च्या ‘स्टँडिंग कमिटी’चे वरिष्ठ सदस्य आहेत. अमेरिकेसंदर्भातील धोरणांचे तज्ज्ञ म्हणून किन्गुओ ओळखण्यात येत असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांमध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केले आहे. नुकताच त्यांनी ‘जर्नल ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी स्टडिज्’ या द्वैमासिकात विस्तृत लेख लिहिला असून त्यात चीनच्या आक्रमक धोरणांवर टीका केली आहे.

‘सुरक्षेच्या तुलनात्मक स्वरुपाकडे दुर्लक्ष करणे व आंधळेपणाने फक्त संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेच्या मागे धावत राहण्याने देश असुरक्षित होऊ शकतो. अशा धोरणांची देशाला जबर किंमत मोजणे भाग पडेल व खरी सुरक्षा देण्यात यश मिळणार नाही’, असे किन्गुओ यांनी बजावले. संरक्षणावर अमर्याद खर्च केल्यास त्यातून शस्त्रस्पर्धा सुरू होईल व त्यामुळे सर्वच देश असुरक्षित बनतील, असा दावाही त्यांनी केला. आपल्या दाव्याचे समर्थन करताना त्यांनी सोव्हिएत युनियनचे उदाहरणे दिले.

‘रशियन संघराज्याने दीर्घकालिन सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत संरक्षणासाठी प्रचंड खर्च केला. त्यामुळे त्याचा आर्थिक विकास पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्यामुळे कालांतराने अमर्याद संरक्षणखर्चासाठी तरतूद करणे अवघड होत गेले. सामान्य जनतेचे जीवनमान सुधारले नाही व त्यामुळे राजवटीला असलेले समर्थन क्षीण झाले. झटपट लाभ मिळविण्यासाठी दीर्घकालिन हितसंबंधांकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा गोष्टींमुळे अराजक माजते व सोव्हिएतप्रमाणे राजवट कोसळते’, असा इशारा वरिष्ठ सल्लागार जिआ किन्गुओ यांनी दिला.

किन्गुओ यांनी आपल्या लेखात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या कालावधीत राबविण्यात येणार्‍या आक्रमक व हेकेखोर धोरणांवर धारदार शब्दात कोरडे ओढले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घ्यायची असेल तर देशाने अधिकाधिक मित्र व कमीत कमी शत्रू बनवायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

leave a reply