मुंबईत ताडदेवमधील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा बळी

- २३ जखमी

मुंबई – शनिवारी ताडदेवमधील सचिनम हाईट या १९ मजली टोलेजंग इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा बळी गेला आहे. तर २३ जण जखमी आहेत. जखमींमध्येही काही जणांना गंभीर इजा झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांप्रती तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

मुंबईत ताडदेवमधील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा बळी - २३ जखमीशनिवारी सकाळी नाना चौकातील भाटीया हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असलेल्या सचिनम हाईटमध्ये मोठी आग लागली. सातच्या सुमाराला इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून आगीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. सकाळची वेळ असल्याने अनेक जण झोपेत होते. त्यामुळे इमारतीमधील अनेकांना आग लागल्याचे उशीरा लक्षात आले. यामुळे वरच्या दोन मजल्यावरील काही जणांना आपल्या बचावाची संधी मिळाली नाही.

या आगीने काही क्षणातच भीषण रुप धारण केले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. इमारतीमधील नागरिकांची धावपळ झाली. यामध्येही अनेक जण पडून जखमी झाल्याचे सांगण्यात येते. इमारतीमधील काही जणांना स्फोटाचा आवाज ऐकला व आगीचे लोट पाहिल्यावर तातडीने फायर ब्रिगेडला फोन केला. अग्नीशामकदलांच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली. मात्र अठराव्या मजल्यावर आग लागल्याने या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्नीशामकदलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही आग ३ श्रेणीची असल्याचे सांगण्यात येते. त्यावरून आगीचे भीषण स्वरुप लक्षात येईल.

राज्य सरकारकडून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर जखमींवर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान कार्यालयाने देखील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

गेल्या काही वर्षात शहरातील आग लागण्याच्या घटनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षात आग लागण्याच्या २६ हजार घटना घडल्या आहेत. यातील ७५ टक्के घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे अग्निशमनदलातर्फे सांगण्यात आले आहे. तर गेल्या काही महिन्यात उंच इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जाते. अशा टोलेजंग इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बर्‍याच अडचणी येत आहेत.

leave a reply