रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-कतारमध्ये युरोपसाठी एलएनजीच्या पुरवठ्यावर चर्चा

अमेरिका-कतारलंडन – युक्रेनच्या सीमेवर तणाव वाढला असून येत्या काळात रशिया युक्रेनवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा पाश्‍चिमात्य देश देत आहेत. असे झाल्यास इंधन व नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर युरोपिय देशांना नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरू रहावा, यासाठी अमेरिकेने कतारबरोबर चर्चा सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. तर युरोपिय महासंघाने देखील सहकारी देशांबरोबर नैसर्गिक वायूची पुरवठा वाढविण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, युरोपिय देश गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा सामना करीत आहेत.

रशियाचे रणगाडे, क्षेपणास्त्रे युक्रेनच्या दिशेने निघाल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला चढवून या देशात रशियाधार्जिणे नेतृत्व प्रस्थापित करील, असा आरोप ब्रिटन करीत आहे. रशियाने ब्रिटनचे हे आरोप फेटाळले आहेत. पण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव वाढला आहे.

युरोपिय देश आपल्या मागणीच्या सुमारे ४० टक्के नैसर्गिक वायूची एकट्या रशियाकडून खरेदी करतात. हा सर्व पुरवठा पाईपलाईनच्या सहाय्याने युक्रेनमार्गेच युरोपिय देशांमध्ये दाखल होतो. अशा परिस्थितीत, येत्या काळात युक्रेनच्या सीमेवर युद्ध पेटलेच तर रशिया नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखून युरोपिय देशांची कोंडी करू शकतो. तसेच अमेरिकेने रशियावर निर्बंध लादलेच तर त्याचे परिणाम युरोपिय देशांवरही होऊ शकतात.

या पार्श्‍वभूमीवर, युरोपिय देशांना नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अमेरिका कतार व इतर आखाती देशांबरोबर चर्चा करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. कतारचे राष्ट्रप्रमुख आमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यासाठी अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

leave a reply