चीन कोरोनाचे पुरावे नष्ट करीत आहे -पाश्चिमात्य माध्यमांचा आरोप

वॉशिंग्टन/लंडन – कोरोनाव्हायरस ही चीनचीच निर्मिती असून याचा उगम वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाला, हे उघड झाल्यानंतर सावध झालेल्या चीनने यासंबंधीचे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाव्हायरसच्या विषाणूवर चिनी संशोधक काम करीत असल्याचे फोटोग्राफ्स तसेच संकेतस्थळांवरील या विषाणूबाबतची माहिती ‘डिलिट’ करण्यात आली आहे. आपल्या बचावासाठी चीनकडून हे प्रयत्न सुरू असले तरी अमेरिका व मित्रदेशांनी लाखो जणांचा जीव घेणाऱ्या या साथीला जबाबदार असलेल्या चीनवर प्रचंड प्रमाणात राजनैतिक व आर्थिक पातळीवरील दडपण वाढविण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाव्हायरसची निर्मिती आणि त्यापुढील फैलाव वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाला, या आरोपांना अधिकाधिक बळ मिळू लागले आहे. वुहान प्रयोगशाळेतील आघाडीच्या संशोधिकेची मुलाखत व चिनी वृत्तवाहिनीच्या जुन्या माहितीपटाने कोरोनाव्हायरस आणि या प्रयोगशाळेचे सत्य अधिक स्पष्टपणे जगासमोर आले आहे. त्यातच या प्रयोगशाळेच्या संकेतस्थळावरील कोरोनाबाबतचे फोटोग्राफ्स, संशोधनाविषयीचे तपशील हे सारे आपले कारस्थान जगासमोर उघड करील, या भीतीने चीनने याचे पुरावे नष्ट करण्याचा चंग बांधला आहे.

पाश्चिमात्य माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांआधी वुहान प्रयोगशाळेच्या संकेतस्थळावर चिनी संशोधक कोरोनाच्या विषाणूवर संशोधन करीत असल्याचे फोटोग्राफ्स दिसत होते. पण अचानक हे फोटोग्राफ्स या संकेतस्थळावरुन काढून टाकण्यात आल्याचे ब्रिटनच्या माध्यमांनी लक्षात आणून दिले. या फोटोग्राफ्सप्रमाणेच कोरोनाव्हायरससंबंधी वुहानमधील ‘चायना युनिव्हर्सिटी ऑफ जियोसायन्सेस’च्या संकेतस्थळांवरील अहवाल सेन्सॉर करण्यात आले आहेत. तर काही माहिती डिलिट केल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाव्हायरसशी संबंधित संकेतस्थळावर सायबर हल्ले झाले होते. या विषाणूबाबतचे पुरावे नष्ट करण्यासाठी चीनकडून हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत होता. कोरोनाव्हायरस संबंधित फोटोग्राफ्स व माहिती संकेतस्थळांवरुन गायब होत असलेल्या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी पाश्चिमात्य माध्यमांनी चीनच्या दूतावासांशी संपर्क केला होता. पण चीनच्या दूतावासांनी यावर प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे.

leave a reply