पाकिस्तानवर टीका करणाऱ्या पीटीएमच्या नेत्याची हत्या

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील खैबरपख्तुन्वा प्रांताच्या दक्षिण वझिरीस्तानमध्ये ‘पश्तून तहफुझ मूव्हमेंट’चे (पीटीएम) वरिष्ठ नेते अरिफ वजीर यांची भर दिवसा हत्या करण्यात आली. ‘पीटीएम’ ही पाकिस्तानातील पश्तू जनतेच्या अधिकारांसाठी लढणारी संघटना असून याचे नेते पाकिस्तानचे लष्कर व गुप्तचर संघटना आयएसआयच्या निशाणावर असल्याचे वारंवार उघड झाले होते. यापार्श्वभूमीवर अरिफ यांची हत्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनीच केली, असा आरोप पीटीएमचे नेते व पाकिस्तान संसद सदस्य मोहसीन दावर यांनी केला आहे.

अरिफ घराच्या बाहेर असताना त्यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी बेछूट गोळीबार केला. हा हल्ला करून मारेकरी पसार झाले. त्यानंतर उपस्थितांनी अरिफ यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पीटीएमच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या अरिफ यांनी काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानला भेट दिली होती व या भेटीत त्यांनी पाकिस्तानी सरकारच्या पश्तू जनतेच्या विरोधातील धोरणांवर कडाडून टीका केली होती.

अरिफ यांच्या या भाषणाचे पडसाद पाकिस्तानात उमटले होते व १७ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या यंत्रणांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. यानंतर पाकिस्तानी लष्कराने अरिफ यांचा काटा काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. पीटीएमचे प्रमुख नेते व पाकिस्तानच्या संसदेचे सदस्य असलेल्या मोहसिन दावर यांनी अरीफ यांच्या हत्येमागे पाकिस्तान पुरस्कृत तालिबानचा हात असल्याचे आरोप केले आहेत.

पाकिस्तानची राजकीय-लष्करी व्यवस्था कायम पश्तू जनतेवर अन्याय व अत्याचार करीत आली आहे. अलीकडच्या काळात याच्याविरोधात काही तरुण पश्तू नेत्यांनी आवाज उठविला होता. मंजूर पश्तीनसारख्या तरुण नेत्याच्या आक्रमक नेतृत्वामुळे पीटीएमला मिळणारा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात वाढला होता. पीटीएमच्या सभेला लाखो जणांची गर्दी जमू लागली होती व पाकिस्तानच्या इस्लामाबादपर्यंत याचे हादरे जाणवू लागले होते. यानंतर पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर संघटना आयएसआयने पीटीएमच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची सुरुवात केल्याचे दिसत आहे.

अरिफ वजीर यांच्या घरातील इतर सदस्यांचीही पाकिस्तानने अशारीतीने हत्या घडविली होती, असे आरोप केले जातात. दहशतवादाला विरोध व पश्तू जनतेच्या अधिकारांची मागणी हे अरिफ वजीर यांच्यासारख्या पश्तू नेत्यांचा गंभीर गुन्हा ठरतो, असे पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेला वाटत आले आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या लष्कर व आयएसआयने पीटीएमच्या नेत्यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष्य करण्याची सुरुवात केल्याचे दिसत आहे.

leave a reply