अणुकराराचे उल्लंघन करणार्‍या इराणने किंमत चुकती करायला तयार रहावे

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

अणुकराराचे उल्लंघनजेरूसलेम – अमेरिका आणि इराणमध्ये व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतच्या वाटाघाटीवर असमाधानी असलेल्या इस्रायलने इराणसह अमेरिकेलाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ‘२०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन करणार्‍या इराणने याची किंमत चुकती करायला तयार रहावे’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. ‘व्हिएन्ना येथील चर्चेत सहभागी होणार्‍या देशांनी इराणविरोधात ठाम भूमिका स्वीकारावी. अणुकरारावरील चर्चा व युरेनियमचे संवर्धन एकाचवेळी चालू शकत नाही, असे इराणला खडसावून सांगावे’, अशी मागणी इस्रायली पंतप्रधानांंनी अमेरिकेकडे केली आहे.

गेल्या आठवड्यात व्हिएन्ना येथे सुरू झालेल्या अणुकराराबाबतच्या चर्चेकडे इस्रायल अतिशय काळजीपूर्वक पाहत आहे. या चर्चेत सहभागी झालेल्या इराणने अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. २०१५ साली झालेल्या अणुकरारातील मुद्यांवर नव्याने चर्चा होऊ शकते, अशी इराणची मागणी आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इराणच्या या भूमिकेवर टीका केली होती. तसेच इराण अणुकरारासाठी गंभीर नसल्याचा आरोप ब्लिंकन यांनी केला होता. पण अणुकराराबाबतच्या वाटाघाटीतून माघार घेणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.

अणुकराराचे उल्लंघनअणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी अमेरिका व इराणकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांवर इस्रायल आपली नाराजी व्यक्त करीत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर इराणला नवा इशारा दिला. गेल्या काही वर्षांमध्ये युरेनियम संवर्धन आणि सेंट्रिफ्यूजेसची निर्मिती वाढवून इराणने २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन केले आहे. इराणने याची किंमत चुकती करायला तयार राहण्याचा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला. पण आर्थिक निर्बंध किंवा लष्करी कारवाई, अशा कोणत्या स्वरुपात ही किंमत चुकती करावी लागेल, याबाबत बोलण्याचे पंतप्रधान बेनेट यांनी टाळले.

या वाटाघाटींमध्ये सहभागी झालेली अमेरिका इराणच्या विरोधात कठोर भूमिका घेत नसल्याची टीका इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली. गेल्या चार दिवसांमध्ये इस्रायलच्या नेत्यांनी व्हिएन्ना वाटाघाटीप्रकरणी अमेरिकेवर दुसर्‍यांदा हल्ला चढविला. दोन दिवसांपूर्वी इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी देखील इराणबरोबरचा कुठलाही वाईट अणुकरार इस्रायल अजिबात खपवून घेणार नसल्याचे बजावले होते.

तर त्याआधी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी आपल्या युरोपच्या दौर्‍यातही लष्करी कारवाईचा धाक व निर्बंधांच्या ताकदीवरच इराणचा अणुकार्यक्रम रोखता येऊ शकतो, असे म्हटले होते. अमेरिकेचे बायडेन प्रशासन या दोन्ही आघाड्यांवर कमी पडत असल्याचे संकेत इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले होते. पंतप्रधान बेनेट यांनी याबाबत इस्रायलची भूमिका अधिक स्पष्ट केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादावे. तसेच इराणविरोधात लष्करी कारवाईचा पर्यायही मोकळा ठेवावा, अशी मागणी इस्रायल करीत आहे. पण अमेरिकेचे बायडेन प्रशासनाने इराणविरोधात लष्करी कारवाईच्या पर्यायाला आधीच नकार दिला आहे. बायडेन प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इस्रायल व अरब मित्रदेशांचा अमेरिकेवरील अविश्‍वास वाढला आहे.

leave a reply