चीनने ऑस्ट्रेलियाविरोधातील व्यापारयुद्ध अधिक तीव्र केले

- तुर्कमेनिस्तानकडून इंधन आयात वाढविणार

बीजिंग – चीन व ऑस्ट्रेलियामधील व्यापारयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. चीनने ऑस्ट्रेलियाकडून आयात होणार्‍या नैसर्गिक इंधनवायूचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानकडून आयात वाढविण्याचे जाहीर केले. गेल्याच आठवड्यात चीनने ऑस्टे्रलियाबरोबरील महत्त्वपूर्ण आर्थिक कराराच्या चर्चेला अनिश्‍चित काळासाठी स्थगिती देत असल्याची घोषणा केली होती.

चीनने ऑस्ट्रेलियाविरोधातील व्यापारयुद्ध अधिक तीव्र केले - तुर्कमेनिस्तानकडून इंधन आयात वाढविणारचीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. २०१९ साली ऑस्ट्रेलियाच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा तब्बल २९ टक्के इतका होता. यामागे दोन देशांमध्ये २०१५ साली झालेला व्यापारी करार व चीनकडून सुरू असलेले प्रयत्न कारणीभूत ठरले होते. मात्र गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध चिघळण्यास सुरुवात झाली असून चीनचा नवा निर्णय त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

चीनने ऑस्ट्रेलियाविरोधातील व्यापारयुद्ध अधिक तीव्र केले - तुर्कमेनिस्तानकडून इंधन आयात वाढविणारगेल्या वर्षी चीनने आयात केलेल्या इंधनवायूपैकी ४६ टक्के वाटा ऑस्ट्रेलियाचा होता. पण आता चीनच्या कंपन्यांना ऑस्ट्रेलियाशी नवे आयात करार न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाऐवजी यापुढे रशिया व मध्य आशियाई देशांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहितीही चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी बुधवारी दिली.

यापूर्वीही चीनने ऑस्ट्रेलियातून आयात होणार्‍या अनेक उत्पादनांवर वाढीव कर लादले असून काहींवर अघोषित बंदीही घातली होती. आता इंधनवायूची आयात कमी करून ऑस्ट्रेलियाची अधिकाधिक कोंडी करण्यासाठी चीन पावले उचलत असल्याचे दिसत आहे.

leave a reply