इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन

वॉशिंग्टन – ‘हजारो रॉकेट्सचा मारा होत असताना इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी अमेरिका इस्रायलचे संपूर्ण समर्थन करील’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना करावी लागली. तसेच हमास आणि इतर दहशतवादी संघटनांनी चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांवर बायडेन यांनी टीका केल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत इस्रायलच्या विरोधात दाखल करण्यात आलेला ठराव अमेरिकेमुळे मंजूर होऊ शकला नाही.

इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेनअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बायडेन यांच्या कमकुवतपणामुळे इस्रायलवर हल्ले होत असल्याचे घणाघाती टीका केली होती. त्यानंतर दडपण वाढलेल्या बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यावर फोनवरुन चर्चा केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी दिली.

तसेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. गाझातून होणारे हल्ले थांबविण्यासाठी अब्बास यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन ब्लिंकन यांनी केले आहे. मात्र अब्बास यांची राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या हमासने इस्रायलवरील हल्ले थांबविण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे या आवाहनाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. सध्या इस्रायल-पॅलेस्टाईनच्या प्रश्‍नावर अमेरिकेत तीव्र मतभेद झाले आहेत.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा पाठिराखा गट मानल्या जाणार्‍या उदारमतवाद्यांकडून पॅलेस्टिनी व हमासच्या बाजूने अमेरिकेने उभे रहावे, अशी मागणी करण्यात येत आहे. तर हमासच्या दहशतवाद्यांच्या विरोधात इस्रायलच्या कठोर कारवाईला बायडेन यांचे प्रशासन पाठिंबा देत नाही, अशी टीका अमेरिकेचे लोकप्रतिनिधी करीत आहेत.

leave a reply