हुवेईवरील बंदी उठविली नाही तर स्वीडिश कंपन्यांना चीनमध्ये संधी मिळणार नाही

- चीनची स्वीडनला धमकी

बीजिंग – स्वीडनच्या सरकारने चीनच्या ‘हुवेई’ कंपनीवरील बंदी उठविली नाही तर स्वीडिश कंपन्यांनानाही चीनच्या बाजारपेठेत संधी मिळणार नाही, अशी धमकी चीनकडून देण्यात आली आहे. चीनचे स्वीडनमधील राजदूत व इतर चिनी सूत्रांचा हवाला देत ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘५जी’ तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी म्हणून ‘हुवेई’ ओळखण्यात येते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी असलेल्या संबंधांच्या जोरावर या कंपनीने जगातील अनेक देशांमध्ये आपले हातपाय पसरण्यात यश मिळविले होत. मात्र तीन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेल्या आक्रमक मोहिमेनंतर हुवेईला मोठ्या प्रमाणात धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे.

अमेरिकेने हुवेईवर बंदी घातली असून त्यापाठोपाठ १० पेक्षा अधिक देशांनी हुवेईवर बंदीची घोषणा केलीआहे. त्यात जपान, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, झेक रिपब्लिक व भारत या देशांसह स्वीडनचाही समावेश आहे. स्वीडनने घातलेल्या बंदीवर चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली असून स्वीडिश कंपन्यांना चीनच्या बाजारपेठेत संधी नाकारण्याची धमकी हा त्याचाच भाग ठरतो.

चीनच्या स्वीडनमधील राजदूतांनी एका मुलाखतीत यासंदर्भात वक्तव्य केले असून, स्वीडन सरकारने बंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा, असे बजावले आहे. यापूर्वी चीनने हुवेईवर बंदी टाकणार्‍या ब्रिटनलाही व्यापारी सहकार्यावर परिणाम होण्याची धमकी देऊन दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता.

leave a reply