इस्रायलच्या लढाऊ विमानांचा इराणच्या हद्दीत शिरकाव नाही

- इराणच्या लष्कराचा खुलासा

तेहरान – गेल्या दोन महिन्यांमध्ये इस्रायलच्या एफ-३५ या स्टेल्थ लढाऊ विमानांनी अनेकवेळा इराणच्या हवाईहद्दीत प्रवेश केला. इस्रायलची विमाने इराणी तसेच रशियन रडारला गुंगारा देण्यात यशस्वी ठरल्या, असा खळबळजनक दावा लंडनस्थित सौदी अरेबियाच्या वर्तमानपत्राने केला होता. पण हे वृत्त हास्यास्पद असून इस्रायलच्या विमानांनी इराणच्या हवाईहद्दीत शिरकाव केलाच नसल्याचे इराणच्या लष्कराने म्हटले आहे.

F35अमेरिका आणि इस्रायलने काही आठवड्यांपूर्वी छुपा युद्धसराव केला. रेड सीच्या क्षेत्रातील इराणच्या हितसंबंधांना लक्ष्य करणे आणि पर्शियन आखातातील इराणच्या विनाशिकांचा ताबा घेण्याचा अभ्यास यावेळी करण्यात आला होता. या सरावादरम्यान, इस्रायलच्या हवाईदलातील ‘एफ-३५’ या अतिप्रगत आणि स्टेल्थ श्रेणीतील लढाऊ विमानांनी इराणच्या हद्दीतून प्रवास केल्याचे ‘इलाफ’ या वर्तमानपत्राने म्हटले होते. अमेरिकन बनावटीची एफ-३५ विमानांचा रडारयंत्रणा वेध घेऊ शकत नाहीत, असा दावा केला जातो.

आपली लढाऊ विमाने इराणवर हल्ल्याच्या तयारीत असल्याची घोषणा इस्रायलचे नेते करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सौदीच्या वर्तमानपत्राने केलेल्या दाव्याचे गांभीर्य वाढले आहे. पण इराणच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल अलीरेझा सबाही-फार्द यांनी सौदीच्या वर्तमानपत्राचा दावा फेटाळला. याआधी इराणने शत्रूच्या कारवायांना जोरदार उत्तर दिले होते आणि यापुढे त्याहून अधिक ताकदीने उत्तर दिले जाईल, असा इशारा अलीरेझा यांनी दिला आहे.

leave a reply