चीन तैवानवर हल्ल्यासाठी संधीच्या शोधात आहे

- सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स

china-jinping-taiwanवॉशिंग्टन – चीन तैवानवर हल्ला चढविणार हे निश्चित आहे. पण रशियाला युक्रेनमधील युद्धात आलेल्या अपयशांचा अभ्यास करून, तैवानवर कसा आणि केव्हा हल्ला करायचा, यावर चीन विचार करीत आहे, असे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी बजावले आहे. तसेच तैवानवरील हल्ल्याबाबत निर्णय घेताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आर्थिक अनिश्चिततेचा विचार देखील करतील, असा दावा बर्न्स यांनी केला.

चीनकडून तैवानवरील हल्ल्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालल्याचा दावा अमेरिका, जपान तसेच युरोपातील नेते व विश्लेषक करीत आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ले चढवू शकतो, असे जपानचे नेते बजावत आहेत. बायडेन प्रशासनाने अद्याप तैवानबाबत ठाम भूमिका स्वीकारलेली नाही. अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी एका कार्यक्रमात बोलताना देखील तैवानच्या मुद्यावर चीनविरोधात भूमिका घेण्याचे टाळले.

china-taiwan-air‘ॲस्पेन सिक्युरिटी फोरम’मध्ये बोलताना सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी अमेरिकेची सुरक्षा आणि जगभरातील सुरक्षाविषयक घडामोडींचा आढावा घेतला. यातही रशिया आणि चीन या अमेरिकेच्या शत्रू देशांवर बर्न्स यांनी आपली भूमिका मांडली. रशियाला युक्रेनमधील युद्धात धोरणात्मक अपयश आल्याचा दावा सीआयएच्या प्रमुखांनी केला. युक्रेनचे युद्ध आपण सहज जिंकू, असे रशियाला वाटले होते. पण रशिया या युद्धात अडकला असून चीन देखील तैवानवर हल्ला चढविण्याआधी याचा नक्की विचार करील, असे बर्न्स म्हणाले.

‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तैवानवर ताबा घेण्याच्या महत्त्वाकांक्षेला कमी लेखता येणार नाही. चीनच्या लष्कराकडे आदेश मिळाल्याबरोबर कारवाईची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य आहे, याबाबत जिनपिंग यांना विश्वास आहे’, असे सांगून चीन तैवानवर हल्ला चढविणारे हे निश्चित असल्याचे बर्न्स यांनी सांगितले. पण त्याआधी युक्रेनमधील युद्धात रशियाला मिळालेल्या अपयशांचा चीन अभ्यास करील, असा दावा बर्न्स यांनी केला.

william-burnsरशियाने संपूर्ण युक्रेनचा ताबा घेण्याऐवजी फक्त डोन्बासवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळेही चीन तैवानवर हल्ला चढविताना सावध पावले टाकील, असे बर्न्स म्हणाले. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यामुळे अमेरिक व युरोपिय देश अधिक जवळ आले आहेत, याचाही विचार चीन करील, अशी माहिती बर्न्स यांनी दिली.

दरम्यान, बायडेन प्रशासनाने तैवानसाठी लष्करी सहाय्याची घोषणा केली होती. पण चीनच्या विरोधामुळे बायडेन प्रशासनाने तैवानबाबतचे आपले निर्णय बदलल्याचेही समोर आलेआहे. गेल्या महिन्यात बायडेन यांनी अमेरिका तैवानला चीनविरोधी युद्धात सहाय्य करील, असे म्हटले होते. पण चीनकडून यावर प्रतिक्रिया आल्यानंतर पेंटॅगॉनने वन चायना पॉलिसीचा अमेरिका आदर करीत असल्याचे म्हटले होते. तर गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीनने यावर आक्षेप घेतल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पेलोसी यांच्या तैवान भेटीला विरोध असल्याचे जाहीर केले.

बायडेन प्रशासनाने तैवानबाबत स्वीकारलेल्या धरसोड धोरणामुळे चीनचे फावत असल्याची टीका अमेरिकेतूनच होत आहे. याचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, असे अमेरिकेतील विश्लेषक बजावत आहेत.

leave a reply