चीनने कोरोनाबाबतचे पुरावे नष्ट केले असतील – ब्रिटनच्या माजी गुप्तचर प्रमुखांचा संशय

लंडन – ‘‘कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नाही, तो चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच पसरविण्यात आला, या दाव्याकडे काही दिवसांपूर्वी ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ म्हणून पाहिले जायचे. पण आता मात्र या थिअरीकडे अत्यंत गंभीरपणे पाहिले जात आहे. असे असले तरी चीनने वुहानच्या प्रयोगशाळेतील कोरोनाबाबतचे सारे पुरावे नष्ट केलेले असू शकतात. त्यामुळे कोरोनाचा विषाणू चीननेच विकसित करून पसरविला, हे सिद्ध करणे अवघड आहे. त्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन चीनमधलाच एखादा संशोधक मोठ्या धैर्याने पुढे यावा लागेल’’, असे ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय6’चे माजी प्रमुख ‘रिचर्ड डिअरलव्ह’ यांनी म्हटले आहे.

कोरोनाबाबतचे पुरावेकोरोनाची साथ म्हणजे चीनचे आंतरराष्ट्रीय कारस्थान असून याद्वारे चीनने जैविक युद्धच छेडल्याच्या आरोपांना दुजोरा मिळू लागला आहे. ‘एमआय6’चे माजी प्रमुख असलेल्या ‘रिचर्ड डिअरलव्ह’ यांनी याआधीही आपण कोरोनाच्या साथीवरून चीनवर संशय व्यक्त केला होता, याची आठवण करून दिली. त्यावेळी आपले म्हणणे उडवून लावण्यात आले, मात्र आता याकडे कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून न पाहता यावर गंभीरपणे विचार केला जात आहे. ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने देखील ही साथ वुहान प्रयोगशाळेतून जाणीवपूर्वक पसरविण्यात आलेली असू शकते, ही बाब मान्य केली आहे. या बदलाची नोंद करून डिअरलव्ह यांनी ट्रम्प यांनी कोरोनाबाबत चीनवर केलेल्या आरोपांकडेही अशारितीने दुर्लक्ष झाले होते, याकडे लक्ष वेधले.

कोरोनाचा विषाणू चीनने विकसित केला असेल आणि त्याचे मूळ ‘वुहान इन्स्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी’मध्ये असले तरी ही बाब पुराव्यानिशी सिद्ध करणे खूपच अवघड जाईल, याची जाणीव डिअरलव्ह यांनी करून दिली. चीनने हे पुरावे नष्ट केले असतील. चीनची राजवट आपल्या विरोधात जाणारी प्रत्येक गोष्ट व व्यक्ती संपविण्यासाठी कुख्यात आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारचे हे अधिकृत धोरणच आहे. अशारितीने आपल्या विरोधात जाणार्‍यांना ‘शांत’ करणे लोकशाहीवादी देशांना पटणारे नाही. पण चीनची कम्युनिस्ट राजवट अशा निर्दयतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे चीनने कोरोनाबाबतची सारी माहिती नष्ट करून टाकण्याची दाट शक्यता आहे’, असा दावा डिअरलव्ह यांनी केला.

कोरोनाबाबतचे पुरावेअशा परिस्थितीत कोरोनाबाबतच्या वैज्ञानिक तपासावरच अवलंबून आहे. अन्यथा जीवावर उदार होऊन चीनमधला एखादा संशोधक पुढे आला, तरच कोरोनाबाबतचे पुरावे जगासमोर येतील. पण याआधी अशी माहिती देणारे चीनमधून गायब झाले आहेत, ही बाब डिअरलव्ह यांनी लक्षात आणून दिली. शिवाय चीनचा गुन्हा सिद्ध झाला तरी हा देश जगाला त्याची भरपाई देण्यास तयार होईल का? असा प्रश्‍न डिअरलव्ह यांनी केला.

जगाबरोबरचे चीनचे संबंध विचारात घेता, चीन भरपाई देण्याची फारशी शक्यता नाही, असा निष्कर्ष डिअरलव्ह यांनी वर्तविला आहे. दरम्यान, चीनने जाणीवपूर्वक

कोरोनाची साथ जगभरात पसरविली, या आरोपाची तीव्रता वाढत चालली आहे. याचे परिणाम दिसू लागले असून दैनंदिन पातळीवर चीनवर आरोप करणारे व संशय व्यक्त करणारे लेख पाश्‍चिमात्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

याचा प्रभाव दिसू लागला असून चीनवरील दडपण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. अमानुष कारवाया करणारा निर्दय देश अशी चीनची प्रतिमा बनलेली आहे व ही प्रतिमा घेऊन चीन कधीही महासत्ता बनणे शक्य नाही, असे आता चिनी विश्‍लेषक सांगत आहेत. अशा परिस्थितीत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांना दिले आहेत.

leave a reply