अमेरिकेला इशारा देण्यासाठी चीनचे तैवानजवळ लष्करी सज्जतेचे प्रदर्शन

बीजिंग – गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याची घोषणा केली होती. पुढच्या काही तासात व्हाईट हाऊस आणि पेंटॅगॉनने ‘वन चायना पॉलिसी`समोर मान तुकवून राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या विधानांचे चुकीचे अर्थ लावण्यात आल्याचा खुलासा केला होता. मात्र याने समाधान न झालेल्या चीनने चीनने तैवानजवळील क्षेत्रात आपल्या विनाशिका आणि लढाऊ विमानांची तैनाती वाढविली. तसेच तैवानच्या हवाई व सागरी क्षेत्राजवळ चीनने लष्करी सज्ज्जतेचे प्रदर्शन सुरू केले आहे. अमेरिकेला उत्तर देण्यासाठी ही सज्जता असल्याचा इशारा चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने दिला आहे.

चीनची लढाऊ विमाने आणि विनाशिकांनी तैवानच्या क्षेत्राजवळ तैनाती तसेच हालचाली वाढविल्याची माहिती, पिपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘ईस्टर्न थिअटर कमांड`चे प्रवक्ते कर्नल शी यी यांनी दिली. यासाठी अमेरिकेने तैवानबाबत केलेली विधाने आणि लष्करी कारवाया जबाबदार असल्याची घोषणा कर्नल शी यांनी केली. तैवानबाबत अमेरिकेची विधाने आणि कृती यांच्यात साम्य नसल्याची टीका चीनच्या लष्करी अधिकाऱ्याने केली.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन ‘वन चायना पॉलिसी`वर ठाम असल्याचे सांगत आहे. पण अमेरिकेची इंडो-पॅसिफिक कमांड तैवानजवळून विमानवाहू युद्धनौका व विनाशिकांचा ताफा रवाना करीत आहे, याकडे कर्नल शी यांनी लक्ष वेधले. अमेरिकेच्या या लष्करी कारवाया तैवानच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्या गटांना पाठबळ देत आहेत. असेच सुरू राहिले तर तैवानला धोका वाढेल, असा इशारा कर्नल शी यांनी केला.

दरम्यान, चीनने तैवानवर हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच चीनच्या 30 विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्राजवळून गस्त घातली होती. याद्वारे चीन तैवानची सज्जता पडताळून पाहत असल्याचा दावा केला जातो.

leave a reply