परराष्ट्रमंत्री जयशंकर स्लोव्हाकिया व झेक प्रजासत्ताकला भेट देणार

नवी दिल्ली – गुरूवापासून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्लोव्हाकिया आणि झेक प्रजासत्ताक या युरोपिय देशांचा दौरा सुरू होईल. युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, युक्रेन किंवा रशियाची बाजू न घेता भारताने राजनैतिक वाटाघाटीनेच हा प्रश्न सुटेल, अशी आग्रही भूमिका स्वीकारली आहे. युक्रेन युद्धाबाबत भारताने स्वीकारलेली ही भूमिका सर्वोत्तम असल्याचे दावा करून जगभरातील तटस्थ निरिक्षक यासाठी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतूक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्र्यांची ही युरोप भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

परराष्ट्रमंत्री जयशंकर स्लोव्हाकिया व झेक प्रजासत्ताकला भेट देणारदरम्यान, युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या युरोपिय देशांबरोबरील संबंधांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर लिंडनर यांनी व्यक्त केला आहे. युक्रेनच्या विरोधात भूमिका न घेता भारताने रशियाबरोबर सहकार्य सुरू ठेवले आहे. त्याचवेळी युक्रेनला मानवी सहाय्य पुरविण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे. हे सारे करीत असताना अमेरिकेचा दबाव भारताने झुगारून दिला आहे. भारताने रशियाच्या विरोधात जावे, यासाठी अमेरिकेने आत्तापर्यंत केलेले सारे प्रयत्न अपयशी ठरले असून यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश अधिकच ठळकपणे जगासमोर येत आहे.

अशा परिस्थितीत युरोपिय देश भारताशी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. भारताचे आर्थिक व धोरणात्मक पातळीवर महत्त्व वाढत चालल्याची बाब यातून अधोरेखित हो आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्रमंत्री जयशंकर झेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकिया या देशांना भेट देत असून यामुळे युरोपिय देशांबरोबरील भारताचे धोरणात्मक सहकार्य अधिकच दृढ होईल.

leave a reply