युआनला जागतिक चलन बनवायचे असल्यास चीनने सुधारणा करायला हव्यात

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांचा सल्ला

युआनवॉशिंग्टन – जर चीनच्या सत्ताधारी राजवटीला आपले युआन चलन जागतिक राखीव चलन बनविण्याची इच्छा असेल, तर त्यांनी अधिक सुधारणा घडवायला हव्यात. त्यासाठी चीनने भांडवली बाजारपेठेवरील निर्बंध उठवायला हवेत, तसेच चलन पूर्णपणे रुपांतरित करण्याचा निर्णय घ्यायला हवा असा सल्ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला. नाणेनिधीच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी हा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय चलन म्हणून स्थान मिळविलेल्या ब्रिटीश पौंड तसेच अमेरिकी डॉलरच्या उपलब्धतेवर कोणतेही नियंत्रण नव्हते, याकडे लक्ष वेधले.

दोन महिन्यांपूर्वी ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीनच्या युआन चलनाचा जागतिक स्तरावरील वापर वाढल्याचे नमूद केले होते. ‘स्विफ्ट’च्या अहवालानुसार, युआनचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हिस्सा 3.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचवेळी अमेरिकी डॉलर व युरो या दोन्ही चलनांचा वापर प्रत्येकी 40 टक्क्यांखाली आला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियन चलनावर टाकलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर युआनचा वापर अधिक वाढल्याचे समोर येत आहे.

युआनरशिया-युक्रेन युद्धाचा फायदा उचलून चीनची राजवट युआनच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला वेग देईल, असे दावे विश्लेषक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञांनी दिलेला सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘पीटर्सन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’च्या कार्यक्रमात गीता गोपीनाथ यांनी चीनच्या राजवटीला सुधारणांचे आवाहन केले.

‘एखाद्या देशाला आपले चलन जागतिक स्तरावरील राखीव चलन व्हावे, अशी इच्छा बाळगून असेल तर त्यासाठी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील भांडवलाचे व्यवहार मुक्त असायला हवेत. देशाचे भांडवली खाते निर्बंधांपासून मुक्त हवे आणि विनिमय दराच्या पातळीवर युआनचलन पूर्णपणे परिवर्तनीय असायला हवे. सध्या चीनमध्ये या गोष्टींचे पालन होत नाही’, असा टोला गोपीनाथ यांनी लगावला. दीर्घकालिन पतधोरणाविरोधात जाऊन भांडवलाचा ओघ थांबविण्याचे निर्णय घेतले जाऊ नयेत किंवा विनिमय दर प्रभावित करण्यासाठीही त्याचा वापर होऊ नये, असा सल्लाही नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी दिला.

चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून आर्थिक विकासदरावर परिणाम होउ नये म्हणून भांडवली व्यवहारात वारंवार हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नाणेनिधीने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. दरम्यान, कोरोना उद्रेक व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. जगातील आघाडीच्या वित्तसंस्थांनी यावर्षी चीनचा आर्थिक विकासदर जेमतेम साडेचार टक्क्यांच्या आसपास राहिल, असे भाकित वर्तविले आहे. यात जेपी मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले, अलायन्झ ट्रेड व बर्कलेज्‌‍ यासारख्या वित्तसंस्थांचा समावेश आहे.

leave a reply