दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने इराणने अणुप्रकल्पातील उपकरणे दडवून ठेवली

अणुप्रकल्पातील उपकरणेतेहरान/ब्रुसेल्स – ‘गेल्या वर्षी इराणच्या कराज अणुप्रकल्पात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इराणने आपल्या अणुप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाची पावले उचलली. याचाच एक भाग म्हणून इराणने सेंट्रिफ्यूज बनविणारी मशिन एका अणुप्रकल्पाच्या खोल जमिनीत नेऊन ठेवली’, अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रवक्ते बेहरोझ कमालवंदी यांनी दिली. इराणच्या अधिकाऱ्याने अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी कुणालाही जबाबदार धरण्याचे टाळले. पण गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये अणुकार्यक्रमावर झालेल्या हल्ल्यांमुळे भीतीपोटी इराणने हे पाऊल उचलल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना इराणच्या अणुप्रकल्पातील घडामोडींबाबत नवी माहिती उघड केली. इराणने नातांझ अणुप्रकल्पाक सेंट्रिफ्यूजेस बनविणारी मशिन खोलवर दडवून ठेवली आहे. हवाई हल्ल्यापासून बचावासाठी इराणने सदर मशिन इतक्या खोल जमिनीखाली नेऊन ठेवल्याचे ग्रॉसी यांनी सांगितले. राजधानी तेहरानजवळील कराज अणुप्रकल्पातून ही मशिन नातांझ येथे नेण्यात आल्याची माहिती ग्रॉसी यांनी दिली.

नातांझ अणुप्रकल्पाच्या तळघरात मोठ्या हॉलमध्ये ही मशिन बसविण्यात आली आहे. याआधी नातांझ अणुप्रकल्पात फक्त युरेनिअम संवर्धनाचे काम सुरू होते. सेंट्रिफ्यूजेसच्या निर्मितीची व्यवस्था नातांझ अणुप्रकल्पात नव्हती. कराज येथील अणुप्रकल्पात सेंट्रिफ्यूजेसची निर्मिती करणारी मशिन होती. पण गेल्या वर्षी जून अणुप्रकल्पातील उपकरणेमहिन्यात कराज अणुप्रकल्पावर ड्रोन्सचे हल्ले झाले. यामध्ये कराज प्रकल्पाचे जबर नुकसान झाल्याचा दावा केला जातो. यानंतर इराणने सेंट्रिफ्यूजेसची निर्मिती करणारी मशिन देखील नातांझमध्ये हलविण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो.

इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रवक्ते बेहरोझ कमालवंदी यांनी देखील सुरक्षेच्या कारणास्तव कराज येथील मशिन नातांझ येथे नेल्याचे स्पष्ट केले. पण यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग जबाबदार असल्याचा ठपका कमालवंदी यांनी ठेवला. इस्रायल आपल्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढवित असल्याचे इराणने अणुऊर्जा आयोगाच्या लक्षात आणून दिले होते. पण आयोग इस्रायलवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे इराणला आपल्या अणुकार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या लागल्याचा आरोप कमालवंदी यांनी केला.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांमध्ये इराणच्या नातांझसह अणुकार्यक्रम व लष्कराशी जोडलेल्या ठिकाणांवर संशयास्पद स्फोट झाले आहेत. यामागे इस्रायल असल्याचा आरोप इराण करीतआहे.

leave a reply