लिपुलेखमधील भारताच्या अस्थायी बांधकामांवर चीनचा आक्षेप

नवी दिल्ली – उत्तराखंडच्या लिपुलेखमधील सीमा भागात भारताने उभारलेल्या अस्थायी बांधकामांना चिनी लष्कराने विरोध केला आहे. याआधी लिपुलेख दरीपर्यंत भारताने उभारलेल्या ‘कैलास मानसरोवर लिंक’ रोडवर नेपाळने आक्षेप नोंदविला होता आणि हा भाग आपल्या क्षेत्रात दाखविणारा नवा नकाशा तयार केला होता. नेपाळला यासाठी चीननेच फूस लावल्याचा दावा विश्लेषकां करीत आहेत. आता चीन कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरू आणि चीनमध्ये जाणारे व्यापारी यांच्या तात्पुरत्या विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या अस्थायी बांधकामांवरून उघडपणे विरोध करीत आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे व यावरून दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. तत्पूर्वी दडपण वाढविण्यासाठी चीन ‘लिपुलेख’मध्ये नवी आघाडी उघडत असल्याचे दिसते.

Indias temporary construction Lipulekh

भारताने ‘लिपुलेख’पर्यंत नवा रस्ता बनवला आहे, तेव्हापासून चीन या भागात चिथावणीखोर हालचाली करीत आहे. चीनच्या लष्कराने या भागातील ज्या अस्थायी बांधकामांवरून आक्षेप घेतला आहे, ती बांधकामे सीमेपासून भारतीय हद्दीत ८०० मीटर अंतरावर उभारण्यात आली आहेत. लिपुलेख खिंडीतून चीनमध्ये ये-जा करणारे व्यापारी आणि कैलास मानसरोवर जाणारे यात्रेकरूंच्या विश्रांतीसाठी ही बांधकामे उभारण्यात आली आहेत. मात्र बुधवारी चिनी लष्कराकडून या बांधकामाला विरोध करण्यात आला. सीमेवर चिनी लष्कराकडून झेंडा फडकविण्यात आला आणि ही बांधकामे हटविण्याची मागणी करण्यात आली. चीनने आपल्या सीमेत केवळ २५० मीटर अंतरावर कित्येक उपकरणे बसविली असून काही अस्थायी बांधकामे केली आहेत. मात्र भारताच्या बांधकामांवर चीन आक्षेप घेत आहे.

दोन्ही देशांमध्ये वाद नसलेल्या भागांवरूनही चीन आता वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनने आपल्या क्षेत्रामध्ये विकास केला आहेत. मात्र आता भारताने सीमेपर्यंत रस्ता बांधल्यावर भारत स्थानिक नागरिक, यात्रेकरू आणि सुरक्षादलांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे, हे चीनच्या अस्वस्थतेमागील कारण असल्याचे, एका लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच लिपुलेखमध्ये चीन घेत असलेल्या आक्षेपाच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. लडाखमधील तणावावरून उच्चस्तरीय चर्चा होणार असताना चीनने लिपुलेखमधील बांधकामांना विरोध करून भारतावरील दडपण वाढवू पाहत आहे.

leave a reply