देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाख ३५ हजारांवर – महाराष्ट्रात चोवीस तासात १३९ जण दगावले

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाख ३५ हजारांजवळ पोहोचली आहे. गुरुवारपासून ते शुक्रवारच्या सकाळपर्यंत देशात २७५ जणांचा बळी गेला आणि सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळले. तर शुक्रवारी रात्री राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून दिवसभरात सुमारे नऊ हजार रुग्णांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रात चोवीस तासात १३९ जण दगावले. राज्यात दर तासाला कोरोनाचे पाच रुग्ण दगावत असून यामुळे चिंता वाढल्या आहेत. दिल्ली, तामिळनाडू आणि गुजरातमध्येही कोरोनाचे रुग्ण दगावण्याचे आणि नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

देशात शुक्रवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ९,८९१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या दोन लाख २६ हजारांपर्यंत पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाचे जाहीर केले. मात्र शुक्रवारच्या रात्रीपर्यंत देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाख ३५ हजारांजवळ पोहोचल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या तीन राज्यातच दिवसभरात ५२०० नवे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात चोवीस तासात १३० जण दगावले. यामुळे राज्यातील या साथीने दगावलेल्यांची संख्या २,८४९ वर पोहोचली आहे. तसेच राज्यात २,४३६ नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी मुंबईत ५४ जण दगावले. तसेच ११५० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ४५ हजारांच्या पुढे गेली आहे. ठाण्यात ३० जण दगावले असून जळगावातील १४ जणांचा बळी गेला आहे. पुणे परिमंडळ क्षेत्रात १६ जणांचा, तर मालेगावमध्ये ८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान दिल्लीत चोवीस तासात १३३० नवे रुग्ण आढळले, तर तामिळनाडूत १४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात गेल्या आठवड्याभरात ६१ हजार नवे रुग्ण आढळले असून याच वेगाने देशात नव्या रुग्णांची नोंद झाली, तर आठवडाभरात देशातील रुग्ण संख्या तीन लाखांच्या पुढे जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

leave a reply