चीनच्या सरकारी मुखपत्राचा भारताला इशारा

बीजिंग – भारत आणि चीन मध्ये संघर्ष झाला तर हिमालयीन क्षेत्राबरोबरच संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात अस्थैर्य माजेल आणि यामुळे भारताचे फार मोठे नुकसान होईल. चीनबरोबर सहकार्य करण्यातच भारताचे अधिक हित सामावलेले आहे, असा सल्लाही ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. त्याच वेळी सध्या लडाखमध्ये सुरू असलेला सीमावाद भारतीय लष्करामुळे सुरु झाल्याचा दावा चीनच्या सरकारी दैनिकाने केला आहे. याआधीही ‘ग्लोबल टाईम्स’ मध्ये वेळोवेळी भारताच्या विरोधात लेख प्रसिद्ध झाले होते. याद्वारे चीन नेहमीच भारताला धमक्या व इशारे देत राहतो.

GlobalTimes Chinaया वेळी ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखात भारताला थेट धमकी देण्याचे टाळले असले तरी यात भारत चीन सारख्या सामर्थ्यशाली देशावर मात करू शकत नाही, असा संदेश देण्यात आला आहे. विशेषतः अमेरिकेच्या नादी लागून चीनशी वैर पत्करू नका, असे या संपादकीय लेखात बजावण्यात आले आहे. तसेच भारतीय माध्यमांवर ही या लेखामध्ये टीका करण्यात आली आहे. भारतीय माध्यमे आपल्या देशाच्या सामर्थ्यबाबत अवास्तव कल्पना बाळगून असल्याचे ‘ग्लोबल टाइम्स’ने या लेखात म्हटले आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले असून यामुळे निर्माण झालेल्या वादाचा लाभ घेण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे, असा आरोप ‘ग्लोबल टाइम्स’च्या संपादकीय लेखात करण्यात आला आहे. अमेरिकेला भारत आणि चीनमध्ये संघर्ष हवा आहे त्यासाठी अमेरिका भारताला चिथावणी देत आहे. वेळ पडल्यास अमेरिका भारताच्या मागे उभी राहील असे संकेत अमेरिकेकडून दिले जातात खरे पण दोन देशांमध्ये संघर्ष पेटवून आपले हित साधण्याचे मतलबी धोरण अमेरिकेने आजवर स्वीकारलेले होते. भारत चीन वादातही अमेरिका तेच करीत आहे, हे भारताने लक्षात घ्यायला हवे . म्हणूनच भारताने आपली फसगत टाळण्यासाठी अमेरिकेवर विश्वास ठेवता कामा नये असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. सीमावादात आपण चीनवर मात करू शकू असे भारतातील काही जणांना वाटत आहे. म्हणूनच अशा मंडळींनी भारत सरकारवर दडपण आणून चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. आक्रमकता दाखविल्यास चीन भारतासमोर नमते घेईल,असा विश्वास या मंडळींना वाटत आहे. परंतु हा त्यांचा भ्रम आहे. चीनला भारताबरोबर शांतता व सहकार्य अपेक्षित असले तरी चीन आपली इंचभरही भूमी सोडणार नाही, असे सांगून ‘ग्लोबल टाइम्स’ ने या संपादकीय लेखात भारताला चीनच्या लष्करी सामर्थ्याचा धाक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ मधून चीनच्या सामर्थ्याचे अशारितीने दाखले दिले जात असले तरी प्रत्यक्षात पूर्वी कधीही नव्हता इतका चीन यावेळी दडपणाखाली आल्याचे दिसत आहे. भारताबरोबरील सीमावाद पेटला की चीन वेगवेगळ्या मार्गांनी भारताला ६२ सालच्या पराभवाची आठवण करून देतो. यावेळी चीन कडून तसे प्रयत्न झालेले नाहीत. भारतातील चिनी राजदूतांनी चर्चेद्वारे सीमावाद सोडविण्याचे आवाहन केले होते. मात्र तसे करीत असताना चीन भारताला घाबरत नाही, असा संदेश देण्यासाठी नेहमीप्रमाणे ‘ग्लोबल टाईम्स’ चा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे.

leave a reply