अमेरिकेतील निदर्शनांमध्ये हिंसाचार घडविणार्‍या १० हजारांहून अधिक जणांना अटक

Protest Americaवॉशिंग्टन – अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्युनंतर झालेली निदर्शने सलग दहाव्या दिवशीही सुरू आहेत. शांततामय मार्गाने सुरू झालेल्या या आंदोलनात अजूनही हिंसक घटनांचे प्रमाण कमी झाले नसून सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे १० हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. राजधानी वॉशिंग्टनसह न्यूयॉर्क, अटलांटा, पोर्टलँड, सिएटल यासारख्या शहरांमध्ये निदर्शने कायम असून पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान आंदोलनाच्या हाताळणीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत असून माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी, ट्रम्प अमेरिकेत दुफळी माजवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

गेल्या महिन्यात २५ मे रोजी, अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील पोलिसी कारवाईत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजात संतापाची लाट उसळली असून पोलिसी अत्याचारांच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन उभे राहिले आहे. अमेरिकेतील जवळपास २५ राज्यांमधील ७५ हून अधिक शहरात निदर्शने सुरू असून मोठ्या प्रमाणावर हिंसक घटनाही घडल्या आहेत. आंदोलन व त्यातील हिंसेचा फायदा काही राजकीय गट व चळवळी घेत असल्याचे आरोपही होत आहेत.

America Protestया पार्श्वभूमीवर, देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून ती ७ जूनपर्यंत कायम राहणार आहे. काही शहरांमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले असून स्थानिक पोलीस यंत्रणांनी हिंसा घडवणाऱ्या निदर्शकांची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे दहा हजारांहून अधिक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतरही हिंसा सुरूच असल्याने पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधूर तसेच वॉटर कॅननचा वापर केला आहे.

दरम्यान, फ्लॉईड यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी एका लेखात ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आंदोलनाची हाताळणी करण्यात ट्रम्प अपयशी ठरले असून ती देशात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मॅटिस यांनी केला. अमेरिकेत गेले तीन वर्षे योग्य नेतृत्व नसून देश आता त्याचे परिणाम भोगत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मॅटिस यांनी केलेल्या टीकेला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चोख प्रत्युत्तर दिले. जनरल मॅटिस अवास्तव महत्त्व मिळालेले अधिकारी आहेत, अशा शब्दात ट्रम्प यांनी फटकारले.

leave a reply