अग्नी-५च्या संभाव्य चाचणीमुळे चीन धास्तावला

नवी दिल्ली – सुमारे पाच हजार किलोमीटर इतकी क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी भारताने केली आहे. याने चीनला कापरे भरले असून भारताने ही चाचणी रोखावी असे आवाहन चीनने केले आहे. यामुळे शस्त्रस्पर्धा भडकेल, अशी भीती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी व्यक्त केली. तसेच ही चाचणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचा भंग करणारी ठरेल, असेही लिजिआन यांनी बजावले. चीनची राजधानी बीजिंग व इतर महत्त्वाची शहरे अग्नी-५च्या टप्प्यात येत असल्याने चीन भारताच्या या संभाव्य चाचणीवर आक्षेप घेत असल्याचे दिसते.

अग्नी-५च्या संभाव्य चाचणीमुळे चीन धास्तावला२३ ते २४ सप्टेंबर दरम्यान देशात नो फ्लाय झोन जाहीर करण्यात आला आहे. अजूनही अधिकृत पातळीवर घोषणा केलेली नसली तरी भारताने अग्नी-५ या आपल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत. अणुस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अग्नी-५ जगभरातील अत्यंत घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन व उत्तर कोरिया या देशांकडे अशा प्रकारची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आहेत. भारतानेही आत्तापर्यंत पाच वेळा अग्नी-५ची चाचणी केली होती. मात्र यावेळची चाचणी विशेष महत्त्वाची असल्याचे मानले जाते.

हे अग्नी-५ क्षेपणास्त्र ‘एमआयआरव्ही’ने (मल्टीपल इंडिपेंटन्टली टार्गेटेबल रिएन्ट्री व्हेईकल्स) सज्ज असेल. म्हणूनच चीन धास्तावल्याचे दिसते. कारण या क्षेपणास्त्राद्वारे एकाच वेळी अनेक ठिकाणे लक्ष्य केली जाऊ शकतात. अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेलाही अग्नी-५ भेदता येऊ शकत नाही. म्हणूनच चीनला याची गंभीरपणे दखल घ्यावी लागत आहे. आधीच्या काळात भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम चीनच्या तब्बल दहा ते पंधरा वर्षे मागे असल्याचे दावे चीनकडून ठोकले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर, चीनने अग्नी-५बाबत व्यक्त केलेली चिंता लक्षवेधी ठरते.

दक्षिण आशियामधील शांती, सुरक्षा व स्थैर्य याचा सर्वांनाच लाभ मिळेल, असे सांगून भारताच्या चाचणीमुळे हे सारे धोक्यात येईल, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी केला. तसेच भारत व पाकिस्तानने १९९८ साली केलेल्या चाचणीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या ठरावानुसार अशाप्रकारच्या चाचण्या करण्यावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत, असे लिजिआन म्हणाले. मात्र उत्तर कोरियासारखा हुकूमशाही असलेला देश बेजबाबदारपणे आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करीत आला आहे, त्याला चीनने असा विरोध केलेला नाही. उलट चीनच्या पाठबळावरच उत्तर कोरिया या चाचण्या करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारत चीनच्या आक्षेपांची पर्वा करण्याची जराही शक्यता नाही. भारताच्या क्षेपणास्त्राला चीन घाबरत असेल, तर ती फार मोठी जमेची बाजू ठरते, अशी प्रतिक्रिया काही भारतीयांनी सोशल मीडियावर नोंदविली आहे.

leave a reply