भारताशी युद्ध छेडून इतर आघाड्यांवरील अपयश लपविण्याचा चीनचा डाव

बीजिंग – गेले काही दिवस चिनी लष्कराकडून भारतीय सीमेवर सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून देशातील अन्नटंचाईसह इतर मोठ्या समस्या दडविण्याचा डाव असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. १९६२ सालीही चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष माओ त्से तुंग यांनी आपले अपयश लपविण्यासाठी भारताविरोधात युद्ध पुकारले होते, याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले आहे. काही महिन्यांपूर्वीच भारताने गलवान व्हॅलीत विश्वासघात करणाऱ्या चीनला चांगलाच दणका दिला होता. त्यानंतरही चीनकडून कारवाया सुरूच राहिल्याने १९६२ सालची पुनरावृत्ती होऊ शकते, असे प्रसारमाध्यमांनी बजावले आहे.

भारताशी युद्ध छेडून इतर आघाड्यांवरील अपयश लपविण्याचा चीनचा डावभारतीय लष्कराकडून लडाखमध्ये नियंत्रणरेषेवर सुरू असलेल्या चिनी आगळीकिला खणखणीत प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गलवान व्हॅलीत बसलेला फटका आणि राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर चर्चा सुरू असतानाही चीनकडून या कारवाया सुरू आहेत. नियंत्रणरेषेवर सातत्याने होणाऱ्या चकमकी म्हणजे भारताला युद्धासाठी चिथावणी देण्याच्या डावपेचांचा भाग असू शकतो, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. चीनमध्ये सध्या १९६२ सालाप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे व त्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष माओने आपले स्थान बळकट करण्यासाठी भारताशी युद्ध करण्याचा पर्याय निवडला होता, याकडे विश्लेषक व प्रसारमाध्यमे लक्ष वेधत आहेत.

कोरोनाव्हायरस साथीमुळे सध्या चीनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला चांगलेच धक्के बसले आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून राबविण्यात येणारे विस्तारवादी धोरण व त्याअंतर्गत वर्चस्व मिळविण्यासाठी सुरू असलेल्या कारवाया, यांचा छुपा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. त्याचवेळी अमेरिकेबरोबर सुरू असलेले व्यापारयुद्ध, जगातील विविध देशांकडून टाकण्यात येणारे निर्बंध आणि कोरोनाच्या साथीमुळे बदललेली समीकरणे, याचे गंभीर परिणाम चिनी अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानला जाणार्‍या निर्यातीला जबरदस्त फटका बसला असून, अंतर्गत मागणीही घटताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे चीनमधील शेतीलाही मोठा फटका बसला असून, अन्नधान्याचे उत्पादन काही टक्क्यांनी घसरण याचे संकेत देण्यात आले आहेत.

भारताशी युद्ध छेडून इतर आघाड्यांवरील अपयश लपविण्याचा चीनचा डावयाच पार्श्वभूमीवर, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी स्वतः पुढाकार घेऊन वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थांविरोधात (फूड वेस्ट) सुरू केलेली मोहीम लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. ‘ऑपरेशन क्लीन प्लेट’ ही मोहीम सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘क्लीन युवर प्लेट कॅम्पेन’चा दुसरा टप्पा असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील प्रसारमाध्यमे जिनपिंग यांनी ही मोहीम संयुक्त राष्ट्रसंघाने ‘फूड वेस्ट’ संदर्भात राबविलेल्या आंतरराष्ट्रीय मोहिमेतील तरतुदींचे पालन करण्याच्या उद्देशाने आखल्याचे म्हटले आहे. मात्र चीनमधून समोर येणारी माहिती वेगळेच चित्र दर्शवीत आहे. चीनमधील एका खाजगी कंपनीने, यावर्षी अन्नधान्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत १.१२ कोटी टनांनी घटेल, असा खळबळजनक दावा केला आहे. त्याचवेळी चीनकडून गेल्या सात महिन्यांत सुमारे २३ टक्के जास्त अन्नधान्याची आयात करण्यात आल्याची माहिती सरकारकडूनच प्रसिद्ध करण्यात आली आहे. गव्हाची आयात १९७ टक्‍क्‍यांनी, तर मक्याची आयात २३ टक्‍क्‍यांहून अधिक वाढल्याचेही समोर आले आहे.

भारताशी युद्ध छेडून इतर आघाड्यांवरील अपयश लपविण्याचा चीनचा डावचीनमधील अन्नधान्य व भाजीपाल्याच्या किमतीत १३ टक्‍क्‍यांनी तर मांस व संबंधित उत्पादनांच्या किमतीत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी काही महिन्यांपूर्वी कोरोना साथीचा उल्लेख करत देशात अन्नसुरक्षेसाठी विशेष योजना आखण्यात येईल, अशी घोषणा केली होती. कोरोना साथीनंतर बसलेल्या अतिवृष्टी व महापुराच्या फटक्याने चीनमधील खेड्यांची अवस्था दयनीय झाली असून, शहरांमधील स्थलांतरितांचा ओघ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. ही सर्व परिस्थिती चीन सध्या अन्नटंचाईसह मोठ्या आर्थिक संकटाच्या वेढ्यात अडकला असल्याचे संकेत देणारी असल्याचे दावे प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहेत. या संकटामागे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चुकीची धोरणे व फसलेले निर्णय, हे मुख्य कारण असल्याचेही मानले जाते.

गेल्या काही महिन्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे नेते, अधिकारी तसेच सदस्यांनी जिनपिंग यांच्यावर केलेली टीकादेखील हेच दाखवून देते. आपले हे अपयश लपविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची जोरदार धडपड सुरू झाली आहे. त्यासाठीच भारताला युद्धासाठी चिथावणी देऊन चिनी जनतेत कथित राष्ट्रवाद भडकविण्याचा डाव जिनपिंग खेळत असल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत आहे.

leave a reply