एक लाख कोटींच्या हवाला प्रकरणी ‘ईडी’कडून नरेश जैनला अटक

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) तब्बल एक लाख कोटी रुपये व्यवहाराचे देशातील सर्वात मोठे हवाला रॅकेट उघड केले आहे. या प्रकरणी हवाला व्यावसायिक नरेश जैनला अटक करण्यात आली आहे. ब्रिटनसह सहा देशांमध्ये ‘वॉन्टेड’ असलेल्या जैनविरोधात इंटरपोलने दोन नोटीसही बजावल्या होत्या. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांसह भारतातील अनेक बड्या उद्योजकांनी जैनच्या हवाला रॅकेटचा वापर केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे.

'ईडी'

गेल्या काही वर्षांत ड्रग माफिया व अन्य गुन्हेगारी नेटवर्कसाठी शेकडो बनावट कंपन्यांचा वापर करून एक लाख कोटी रुपयांहुन अधिक मूल्याचे हवाला व्यवहार केल्याप्रकरणी जैनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ‘मनी लॉन्डरिंग प्रिव्हेंशन अ‍ॅक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनला दिल्लीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून सुनावणीनंतर त्याची रवानगी नऊ दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. ईडीकडून करण्यात येत असलेल्या तपासात ५५४ ‘शेल’ कंपन्या, ९४० संशयित बँक खाती आणि सुमारे १.०७ लाख कोटी रुपयांच्या ‘हवाला मनी’ तपास करण्यात येत आहे. हे देशातील सर्वात मोठे हवाला रॅकेट असल्याचे सांगितले जाते.

ईडीच्या तपासात काही बड्या खाजगी कंपन्यांचा व एका मोठ्या परकीय चलन कंपनीचादेखील तपास करण्यात येत आहे. ‘ईडी’ने ९७० जणांची ओळख पटवली असून त्यांना सुमारे १८,६८० कोटी रुपयांची रक्कम हवालामार्फत हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच ११४ परदेशी बँक खात्यात ११,८०० कोटी रुपयांचे हवाला व्यवहार केल्याची माहिती मिळाल्याचे ईडीने निवेदनात म्हटले आहे. ईडीने अनेक बनावट कागदपत्रे, मार्कशीट, जन्म प्रमाणपत्रे, पॅनकार्ड व मतदार ओळखपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या बनावट कागदपत्रांच्या आधारे संशयित बँक खाती आणि शेल कंपन्या चालवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

'ईडी'

‘मनी लॉन्डरिंग’ प्रकरणी जैनला यापूर्वी २००९ साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून जैन पुन्हा तपासयंत्रणांच्या रडारवर आला होता. २०१६ साली ईडीने त्याला १२०० कोटी रुपयांच्या परकीय चलन व्यवहार प्रकरणी नोटीसदेखील बजावली होती. जैन गेल्या अनेक वर्षांपासून ‘हवाला’ रॅकेट चालवीत होता. त्याच्यावर गुन्हेगारी टोळ्यांना निधी पुरवल्याचा देखील आरोप आहे. २०१८ साली जैनच्या दिल्लीतील रोहिणी व विकासपुरीमधील दोन जागांवर छापे मारण्यात आले होते. त्यावेळी हजारो कोटींच्या हवाला व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. परदेशी बँक खाती चालवण्यासाठी वापरण्यात आलेल्या १४ ‘डिजिटल कीज्’देखील जप्त केल्या होत्या. तसेच कथित शेल कंपनीशी संबंधित पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह इत्यादी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती.

तैवान, व्हिएतनाम, बांगलादेश, तुर्की, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, ब्राझील, बुर्किना फासो, कॅनडा व अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये जैन याने त्याचे हवाला रॅकेटचे जाळे पसरविल्याची माहिती समोर आली आहे. तर अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, नेदरलँड्स आणि युएईसह किमान सहा देशांमध्ये नरेश जैनवर गुन्हे दाखल आहेत. जैन १९९५ मध्ये प्रथम भारतातून पळाला व दुबईला गेला होता. २००९ पर्यंत तो दुबईत होता. दुबई पोलिसांनी फेब्रुवारी २००७ मध्ये जैन आणि इतर नऊजणांना अटक केली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर तो दुबईहून पळून गेला होता. ब्रिटनच्या ‘सीरियस ऑर्गनाइज्ड क्राइम एजन्सी’ने (एसओसीए) २००९ मध्ये भारताला जैन आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लाँडरिंग प्रकरणांचा अहवालही दिला होता. त्याचवेळी त्याच्याविरुद्ध इंटरपोलने दोन अटक वॉरंट जारी केले होते.

leave a reply