भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा लाभ घेण्याची चीनची तयारी – विश्‍लेषकांचा इशारा

नवी दिल्ली – गेल्या वर्षी भारतात कोरोनाची साथ दाखल झाल्यानंतर, याचा फायदा घेऊन चीनने लडाखच्या एलएसीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. आता कोरोनाची दुसरी लाट भारतात हाहाकार माजवित असताना, चीनने लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात क्षेपणास्त्रे तैनात केल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी भारताला पुरविण्यात येणारे वैद्यकीय साहित्य रोखून, त्याचे दर वाढवून आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा पुरवठा करून चीन आपल्या भारतद्वेषाचे विखारी प्रदर्शन करीत असल्याचे दिसते. भारतीय विश्‍लेषक व मुत्सद्दी याच्या गंभीर परिणामांचा दाखला देत असून पुढच्या काळात चीनला याची किंमत चुकती करावी लागेल, असे बजावत आहेत.

कोरोनाची साथ म्हणजे चीनने जगाला दिलेली ‘भेट’ असल्याची टीका होत आहे. भारतात कोरोनाची पहिली लाट आलेली असताना, चीनने लडाखच्या एलएसीवर घुसखोरीचा प्रयत्न करून पाहिला. मात्र सावध असलेल्या भारतीय सैन्याने चीनच्या लष्कराला रोखले. भारतीय सैन्याचा निर्धार चीनला चकीत करणारा ठरला होता. त्यानंतर गलवानच्या खोर्‍यात झालेली चकमक देखील चीनला चांगलाच धडा शिकविणारी होती. या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले असले तरी यामुळे चीनची फार मोठी हानी झाल्याचे दावे समोर आले होते. यानंतर खवळलेल्या भारताने चीनला लक्ष्य करणार्‍या आर्थिक व राजकीय पातळीवरील निर्णयांचा सपाटा लावला होता.

लडाखच्या एलएसीवरील काही भागांमधून चीनने आपले जवान मागे घेतले असले तरी अजूनही काही ठिकाणाहून चीन माघार घ्यायला तयार नाही. इतकेच नाही तर लडाखच्या एलएसीपासून जवळ असलेल्या तिबेटच्या क्षेत्रात चीनने क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. भारतानेही तोडीस तोड तैनाती करून चीनला प्रत्युत्तर दिले. मात्र चीनच्या या तैनातीचे टायमिंग विचारात घ्यावेच लागेल, असा इशारा भारतीय मुत्सद्दी देत आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतात हाहाकार माजवित आहे. अशा भयंकर आपत्तीचा सामना करीत असताना, भारताच्या सीमेजवळ तैनाती वाढवून चीन याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहे, ही बाब चीनचे राष्ट्रीय चरित्र दाखवून देणारी आहे.

यापुढे भारत आपल्यावर कधीही विश्‍वास?ठेवणे शक्य नाही, अशा स्थिती चीन स्वतःहून निर्माण करीत आहे. तसेच आपल्या विरोधात असलेल्या क्वाडसारख्या गटात चीनच भारताला ढकलत आहे, असा ठपका भारतीय विश्‍लेषकांकडून ठेवला जात आहे.

चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने मात्र भारतीय विश्‍लेषक भारताला चीनचा कायस्वरुपी शत्रू बनवित असल्याचा ठपका ठेवला. भारतातील काही चीनविरोधी विश्‍लेषक दोन्ही देशांमधील वैर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप ग्लोबल टाईम्सने केला. कोरोनाची साथ आलेली असताना, चीन भारताला मोठे सहाय्य पुरवित आहे, त्याकडे हे विश्‍लेषक लक्ष देत नाहीत, अशी नाराजीही चीनच्या या सरकारी दैनिकाने व्यक्त केली.

प्रत्यक्षात चीन वैद्यकीय साहित्य व उपकरणे यांचा पुरवठा रोखून, त्यांच्या किंमतीत वाढ करून भारताची शक्य तितकी कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर भारताने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती, तरी चीनवर त्याचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे भारताची आपत्ती ही आपल्यासाठी चालून आलेली संधी असल्याचे चीन मानत आहे, ही बाब यामुळे उघड झाली आहे.

leave a reply