जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उगमस्थानाचा नीट तपास केलेला नाही – तटस्थ संशोधकांचा गंभीर आरोप

लंडन – ३३ लाखाहून अधिक जणांचा बळी घेणार्‍या आणि जगाचे लाखो कोटी डॉलर्सचे नुकसान करून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्थ करणार्‍या कोरोनाची साथ रोखता आली असती. पण जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन-डब्ल्यूएचओ)यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत. इतकेच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उगमस्थानाचाही नीट तपास केला नाही. हा विषाणू प्रयोगशाळेतून अपघाताने बाहेर आलेला नाही, असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. पण ही शक्यता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही, त्याकडे ‘डब्ल्यूएचओ’ही शक्यता विचारात घेतली नाही, असा ठपका तटस्थ संशोधकांनी ठेवला आहे.

‘कोव्हिड-१९: मेक इट द लास्ट पॅनडेमिक’ नावाचा ८६ पानांचा अहवाल ‘डब्ल्यूएचओ’ने तयार केला आहे. यामध्ये चिनी संशोधकांचाही समावेश होता. या अहवालाच्या विश्‍वासार्हतेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे २०१५ सालीच चीनच्या लष्करी अधिकार्‍यांनी तिसर्‍या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून कोरोनाच्या साथीचा वापर करण्याची तयारी केली होती, अशा बातम्या उघड झाल्या आहेत. तर दुसर्‍या बाजूला ‘डब्ल्यूएचओ’ मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चीनला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. लवकरच ब्रिटनमध्ये होणार्‍या ‘जी-२०’ परिषदेत ‘डब्ल्यूएचओ’ आपला कोरोनाबाबतचा अहवाल प्रसिद्ध करणार आहे. पण ही साथ कुठून व कशी आली, ते स्पष्ट करण्याच्या ऐवजी या अहवालात या साथीचा प्रसार जगभरात कसा झाला, याकडेच अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

केंब्रिज या ख्यातनाम विद्यापीठाचे क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट रविंद्र गुप्ता यांनी ‘डब्ल्यूएचओ’चा अहवाल अपूर्ण असल्याचे सांगून कोरोनाच्या उगमाबाबत अधिक तपास करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर फ्रेड हचिस्न कॅन्सर रिसर्च सेंटरचे अभ्यासक जेसी ब्ल्यूम हे रविंद्र गुप्ता यांनी नोंदविलेल्या निष्कर्षाला दुजोरा दिला. प्रयोगशाळेतून अपघाताने कोरोनाचा फैलाव झाला, ही शक्यता फेटाळता येणार नाही, त्यावर अधिक तपासाची आवश्यकता असल्याचे अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डेव्हिड रेल्मन यांनी म्हटले आहे.

यामुळे ‘डब्ल्यूएचओ’चा अहवाल स्वीकारायला संशोधक तयार नसल्याचे दिसते. याआधीही ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने पक्षपाती भूमिका स्वीकारीत असल्याचे गंभीर आरोप झाले होते. कोरोनाची साथ वेळीच रोखता येणे शक्य होते, पण त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली नाही. तसे करण्यात ‘डब्ल्यूएचओ’ अपयशी ठरली, अशी टीका अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. युरोपिय देशांनीही ‘डब्ल्यूएचओ’च्या चीनधार्जिण्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. आता या अहवालाच्या निमित्ताने संशोधक देखील ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाच्या उगमस्थानाची तपास योग्यरितीने न केल्याची टीका करीत आहेत.

कोरोना म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी केला होता. थेट नामोल्लेख टाळून राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी केलेली ही टीका जगभरात खळबळ माजविणारी ठरली होती. कोरोनाची साथ आल्यानंतर ‘जी२०’ मधल्या कुठल्या देशाचा जीडीपी वाढला? असा प्रश्‍न करून ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनकडे बोट दाखविले होते. तसेच सर्वच देशांच्या लष्करांना जैविक व रासायनिक युद्ध सुरू झाले आहे, याची जाणीव असल्याचे बोल्सोनारो म्हणाले होेते.

तर २०१५ साली चीनच्या लष्करी संशोधक व आरोग्यतज्ज्ञांनी ‘द अननॅचरल ओरिजिन ऑफ सार्स ऍण्ड न्यू स्पेसीज् ऑफ मॅनमेड व्हायरसेस ऍज जेनेटिक बायोवेपन्स’ नावाचा रिसर्च पेपर तयार केला होता. यामध्ये विषाणूंचा वापर करून जगभरात साथ पसविण्याची व त्याद्वारे चीनचे वर्चस्व वाढविण्याची योजना मांडण्यात आली होती. द ऑस्ट्रेलियन नावाच्या दैनिकाने याबाबतची बातमी नुकतीच प्रसिद्ध केली. यानंतर कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्ध असल्याचा आरोप सुरू झाला होता. आता अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी देखील या दाव्याला दुजोरा देत असल्याचे दिसते.

चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. त्याचवेळी डब्ल्यूएचओ देखील या कामी चीनला सहाय्य करीत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्युएस हे चीनचे खंदे समर्थक असल्याचे मानले जातात. डब्ल्यूएचओच्या प्रमुखपदावर चीननेच त्यांनी वर्णी लावली होती, असा आरोप होत आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओ चीनचा बचाव करणारे अहवाल प्रसिद्ध करीत असून चीनच्या विरोधातील माहिती दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप कोरोनाची साथ आल्यापासूनच सुरू झाले होते.

leave a reply