आर्टिफिशल इंटेलिजन्समधील आघाडीसाठी चीन-रशियाचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय उलथापालथी घडवतील

- ब्रिटनच्या ‘एमआय६’च्या प्रमुखांचा इशारा

आर्टिफिशल इंटेलिजन्सलंडन – ‘आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रभुत्त्व मिळविण्यासाठी चीन व रशिया करीत असलेले शर्थीचे प्रयत्न पुढील दहा वर्षांमध्ये भू-राजकीय समिकरणे बदलून टाकतील. इतकेच नाही तर क्वांटम कम्प्युटिंग, सिंथेटिक बायोलॉजीमध्ये आघाडी मिळविण्याची या दोन्ही देशांची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी हे देश करीत असलेले गुंतवणूक चिंताजनक ठरते. या धोक्याकडे लोकशाहीवादी शक्तींनी लक्ष पुरविणे आवश्यक आहे’, असा इशारा ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय६’चे प्रमुख रिचर्ड मूर यांनी दिला.

एमआय६चे प्रमुख म्हणून रिचर्ड मूर पहिल्यांदाच आपली भूमिका ब्रिटनचे सरकार व सुरक्षा यंत्रणांसमोर मांडणार आहेत. त्याआधी मूर यांच्या भाषणातील काही मुद्दे ब्रिटनच्या सरकारने सोमवारी प्रसिद्ध केले. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यपद्धतीत मोठ्या बदलांची आवश्यकता असल्याचे मूर यांनी सुचविले आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांनी जुनी बंधने झुगारणे गरजेचे असल्याचे मूर म्हणाले.

आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात ब्रिटन चीन-रशियापेक्षा खूपच मागे असल्याची परखड जाणीव मूर यांनी करून दिली. एआयमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी चीन आणि रशिया शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे याआधी उघड झाले होते. तर अमेरिका, ब्रिटन या क्षेत्रात अजून खूप मागे असल्याचे इशारे अमेरिकन यंत्रणा व लष्करी विश्‍लेषकांनी दिले होते. रिचर्ड मूर यांनी देखील हाच इशारा दिला.

आर्टिफिशल इंटेलिजन्स‘येत्या दशकात तंत्रज्ञान क्षेत्रात होणारी प्रगती, गेल्या शतकात झालेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीला मागे टाकेल, इतक्या झपाट्याने या क्षेत्रात प्रगती होणार आहे. समाज म्हणून आपण ही वस्तूस्थिती व त्याचे भू-राजकीय परिणाम स्वीकारायला हवे. ‘एमआय६’ला याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष पुरवावे लागेल’’, याकडे मूर लक्ष वेधले.

एआय, क्वांटम कम्प्युटिंग, सिंथेटिक बायोलॉजी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी एमआय६ला या क्षेत्रातील इतर कंपन्यांबरोबर सहकार्य वाढवावे लागेल. यासाठी सरकारी कंपन्यांबरोबरच्या सहकार्यातून बाहेर पडावे लागेल, असे सांगून मूर यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. जेम्स बॉंडच्या हॉलिवूडपटाप्रमाणे एमआय६ देखील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीसाठी आपल्याच यंत्रणांवर अवलंबून असल्यामुळे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा विकास झालेला नाही, असे टोला यावेळी मूर यांनी लगावला.

येत्या काळात एआय व तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर आघाड्यांवर तोडीस तोड काम केले नाही तर चीन आणि रशिया हेरगिरीच्या क्षेत्रातही नवी क्रांती घडवतील, असा इशारा एमआय६च्या प्रमुखांनी दिला.

leave a reply